पुस्तक परिचय

१. मुक्तिगाथा महामानवाची

महायोगी श्री अरविंद चरित्र आणि तत्वज्ञान

प्राचार्य. शिवाजीराव भोसले.

जेथून शब्द मागे फिरतात व जेथे सर्व संकल्प सरतात, जे वृक्षाचं मूळ व योगवृक्षाचे फळ ते अनादी व अगम्य परमतत्त्व श्री अरविंदांना गवसलं. या गवसण्याचा शोध आणि वेध घेणारं हे चरित्र मुखपृष्ठापासूनच वाचकांना आकर्षित करून घेते. मुखपृष्ठावरचं श्रीअरविंदांचे छायाचित्र म्हणजे कोणत्यातरी गूढ विश्वाचा वेध घेणारे आत्ममग्न व्यक्तिमत्त्व भासते. मलपृष्ठावरचा ब्लर्ब त्यांचे सारे चरित्र थोडक्यात सांगून जातो. महायोग्याची, महामानवाची ही मुक्तिगाथा आहे. गाथा म्हणजे गाऊन सांगितलेली कथा. वाचक रंगतील, रमतील  अशा पद्धतीने येणारे हे श्रीअरविंद घोष यांचे चरित्र आणि तत्वज्ञान आहे.

या ग्रंथाचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले हे वाणी आणि लेखणीचे सच्चे उपासक होते. या उपासनेने शिक्षणाच्या प्रांतातून ते आपसूकच लोकशिक्षणाच्या प्रांतात पोहोचले. अनेक पिढ्यांची मनं सुसंस्कारित करत राहिले. आपल्याला अप्रूप वाटतं ते त्यांच्या पुस्तकामध्ये छापलेल्या घरच्या पत्त्याचे. ‘श्री अरविंद’ निवासात राहणा-या आणि ‘स्वामी विवेकानंद’ नगरात वावरणा-या माणसाने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल, दाखवलेल्या वाटेबद्दल आपण काय बोलावं? अक्षरब्रह्म प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक ब्रह्माचे दर्शन न घडवेल तरच नवल. ही अक्षरे ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’चा प्रत्यय देतात. या पिंडाच्या आणि ब्रह्मांडाच्या विकसित होण्याच्या सर्व शक्यता, क्षमता आणि  इंद्रियगोचरते पलीकडचं जग कवेत घेतात. हे पुस्तक  ‘अवनीतलावर अतिमानसाचे अवतरण घडविणाऱ्या आदिमायेस’ म्हणजेच श्रीमाताजींच्या चरणकमली अर्पित केलेले आहे. श्रीअरविंद यांची गाथा माताजींच्या चरणी अर्पित होणे, Without him, I exist not; without me, he is unmanifest या माताजींच्या वचनाचा प्रत्यय देणारे आहे.

 २१२ पृष्ठांचे हे पुस्तक एकूण १० भागात विभागलेले आहे. ‘या कारणे हे घडले’ या शीर्षकाखाली या पुस्तकाची जन्मकथा कळते. श्रीअरविंदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भोसले सरांनी दिलेली व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली ती १९९८ मध्ये. त्याला निमित्त घडले ते जयंतीच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे. तेव्हा १५० व्या जयंतीच्या निमित्ताने या पुस्तकाचे स्मरण करावे, हे उचितच आहे. १९७२-१९७३ ला दिलेली व्याख्याने १९९८ ला प्रकाशित झाली. म्हणजे या चिंतनाचे हीरकमहोत्सवी वर्ष जवळ आले आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी श्रीअरविंदाविषयी केलेल्या चिंतनाचा हीरक महोत्सव, भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि श्रीअरविंदांची १५० वी जयंती या त्रिवेणी संगमावर आपण या चरित्राचे चिंतन, मनन, अनुसरण करत राहिले पाहिजे.श्रीअरविंद घोष यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या चरित्राचे केलेले हे चिंतन, श्रीअरविंदांनी भावी काळासाठी दिलेले दिशानिर्देश स्पष्ट करणारे आहेत. 

या ग्रंथाची फलश्रुती लेखकाच्या भाषेत सांगायची तर, “ज्याचा ओझरता, निसटता स्पर्श झाला असता विवेकाचे पांग फिटतात, इंद्रिये विषयसंग विसरतात असे काही या जीवनात आहे, असा भाव वाचकांच्या ठायी निर्माण झाला तर लिहिण्याचे सार्थक झाले असे  मानावे लागेल. मात्र असेच घडले पाहिजे असा आग्रह नाही. सर्वांची प्रकृती व प्रतिक्रिया सारखी असणार नाही. सूर्यबिंबाचा भार कदाचित पर्वताला पेलणार नाही; पण दवबिंदूला त्याचे ओझे वाटणार नाही. जे घडते ते प्रकृतीधर्मानुसार.”

 भारतीय संस्कृतीची  धर्म ही संकल्पनाच प्राचार्य जणू इथे व्यक्त करतात. 

J. J.