
“पहिल्याच दृष्टिक्षेपात मला कळून आले की त्यांना सत्य आत्मदर्शन झाले आहे. त्यांच्या हृदयात ज्या भगवती प्रकाशाचा उदय झाला आहे, तो तितक्याच प्रभावीपणे बाह्य जग ही निश्चितपणे उजळून टाकेल”
असे वर्णन रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या डायरीत ज्या योग्याशी भेटल्यावर केले आहे त्या श्रीअरविंदांच्या जीवन प्रवासाला चित्रित करणारे हे पुस्तक.
‘घरगंगेच्या काठी’, ‘रमाबाई’ अशी मराठी तर ‘कॅक्टस’ सारखी हिंदी साहित्यकृती ज्यांनी आपल्या उत्कृष्ट भाषाशैलीत लिहिली त्या ज्योत्स्ना देवधर यांनी ही अरविंदाच्या जीवनावर आधारित कादंबरी आपल्या लेखणीतून उतरवली आहे.
सहा भागात विभागलेल्या या केवळ १५० पानांच्या पुस्तकात लेखिकेने या लोकविलक्षण चरित्राचा वेध घेतला आहे. सुटाबुटातला लहानगा अरविंद, क्रांतिकारी अरविंद ते पूर्णयोगी श्रीअरविंद ही त्यांच्या जीवनातील विविध वळणे या पुस्तकातून जणू आपण प्रत्यक्ष अनुभवतो. लेखिकेच्या ओघवत्या लेखन शैलीचा हा प्रभाव आहे.
पुस्तकाच्या पूर्वार्धात अरविंद पॉन्डिचेरीला येण्याच्या आधीचे त्यांचे जीवन रेखाटले आहे. त्यांचे राजनारायण बोस ,स्वर्णलता, सरोज, मृणालिनी, बारीन यांच्या बरोबरचे संबंध, संवाद यात प्रामुख्याने आपल्याला उलगडू लागतात. त्यांचे बडोदा संस्थानात असतानाचे जीवन या भागात अधोरेखित होते.
उत्तरार्धात पाँडिचेरी येथे येऊन स्थायिक झाल्यावरचे त्यांचे आयुष्य वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्या समोर येत राहते. नलिनीकांत, विजय, चंपक या आणि इतर सहकाऱ्यांबरोबरच्या त्यांच्या योगा बद्दलच्या धीर गंभीर चर्चा आणि खेळीमेळीच्या वातावरणातील हलक्याफुलक्या गप्पाही लेखिकेने आकर्षकपणे मांडल्या आहेत. श्री अरविंद यांच्या योगसाधने सोबतच माताजी आणि आश्रम यांचे अलौकिक चित्र आपल्या समोर उभे राहते.
आपल्याला अनोख्या विश्वात घेऊन जाणारे हे मॅजेस्टिक प्रकाशनाचे पुस्तक १९७३ साली प्रकाशित झाले.
अरविंदांच्या जीवनाबरोबरच त्यांचे तत्वज्ञान, विचार, पूर्णयोग आपल्याला उमजते.
कधी शांत, कधी क्रांतीने पेटलेले, कधी हळवे तर कधी योगात तल्लीन झालेले – अशी अरविंदांची अनेक रूपे हे पुस्तक आपल्यासमोर सहजपणे उभे करते.
आपल्या मनातील सुप्त भावना व जाणिवांना एका महान मानवाच्या जीवन कथेतून हे पुस्तक नकळत स्पर्श करून जाते. श्रीअरविंदांच्या जीवनाचे ओघवते वर्णन वाचण्याची पर्वणी आपल्याला या पुस्तकाच्या निमित्ताने मिळते.
अनुष्का लोहिया
छान.
छान ,समर्पक शब्दात पुस्तक परिचय