एकदा वर्गात तास सुरु असताना काही विद्यार्थ्यांनी प्राध्यापक महोदयांना विचारले ,” सर, राष्ट्रवादाचा विकास कसा करता येईल ?” त्यावेळेस लगोलग प्राध्यापक महोदय भारताच्या नकाशाकडे निर्देश करत विद्यार्थ्यांना म्हणाले , ” या नकाशाकडे केवळ नकाशा म्हणून पाहू नका. बारकाईने पाहिल्यास त्यात तुम्हाला भारतमातचे सांगोपांग दर्शन होईल. म्हणजे असे की या नकाशावरील शहरे, पर्वते, नद्या आणि जंगले म्हणजेच तिचे शरीर आहे. त्यात दिसणारे लोक म्हणजे तिच्या शरीरातील धमन्या आहेत. आपली व्यापक संस्कृती तिचा आत्मा आहे. तिच्या लेकरांचे स्वातंत्र्य आणि आनंद म्हणजेच तिची मुक्ती आहे. त्यामुळे, नवविधा भक्तीची संकल्पना नजरेसमोर ठेऊन तन, मन आणि धनाने तिची पूजा करणे हेच आपले इष्ट आणि आद्य असे परमकर्तव्य आहे. आता तिच्यासाठीच जगणे आणि तिच्याचसाठी मरणे हा आणि हाच आपला निदिध्यास व्हायला हवा. तिच्या स्वातंत्र्याची आणि मुक्तीचीच साधना व्हायला हवी.” हे प्राध्यापक महोदय म्हणजेच महायोगी श्री अरविंद होत. तत्वज्ञ, योगी, कवी, पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत, प्रशासक याबरोबरच स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते हे देखील महायोगी श्री अरविंदांचे अविभाज्य अंग होते. तसे पाहिल्यास, आपल्या मुलाच्या मनात राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्यलढा या गोष्टीचे जरादेखील आकर्षण निर्माण होऊ नये आणि घरादारावर तुळशीपत्र ठेऊन देशाची तमा बाळगत व्यक्तिगत जीवन संघर्षमय होऊ नये अशीच श्री अरविंदांच्या पित्याची इच्छा होती आणि त्यांनी त्यादृष्टीने भरपूर प्रयत्न करून पहिले. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. म्हणूनच, स्वातंत्र्याची चाड, पारतंत्र्याची चीड आणि पराक्रमाची ओढ़ श्री अरविंदांच्या मनात सतत धगधगत राहिली आणि त्याचेच रूपांतरण त्यांच्या स्वराज्यप्राप्तीच्या सक्रिय सहभागात झाले. त्यामुळे श्री अरविंद आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे सतत देहाने पारतंत्र्यात, मनाने आणि कृतीने स्वातंत्र्यसंग्रामात आणि कल्पनेने भारतमातेच्या मुक्ती आणि स्वातंत्र्यात राहिले. मुंबई येथे 19 जानेवारी 1908 रोजी केलेल्या भाषणात श्री अरविंद उद्गारले, “राष्ट्रवाद म्हणजे केवळ अभिमानाची मिरासदारी नव्हे., केवळ राजकीय कार्यक्रमांची आतिषबाजी तर नावेच नव्हे. तर, राष्ट्रवाद हा देवाने दिलेला प्रसाद होय. तो एक ईश्वरी धर्म आहे. त्याला फार मोठे धार्मिक वलय आहे. त्यामुळे, राष्ट्रवाद अजरामर आहे. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. इतरांना वेदना आणि विवंचना देऊन राष्ट्रवाद निर्माण होणार नाही. तर प्राणपणाने प्रयत्न करावे लागतील आणि त्यातूनच राष्ट्रवादाचा सूर्य तळपेल. त्यातूनच हा देश उठेल ,पेटेल आणि जिंकेल सुद्धा. खरे म्हणजे राष्ट्रवादाच्या नावाखाली अनेक विकृत गोष्टी आज घडत असताना राष्ट्रवादाच्या मूळ संकल्पनेचे अहोरात्र चिंतन आवश्यक वाटते. श्री अरविंदांच्या ‘ Rebirth of India’ – (भारताचा पुनर्जन्म) या पुस्तकातील विचारसूत्रानुसार भारत मृतप्राय नाही. तो सर्जक आणि संगोपक आहे. त्यामुळे, तो संजीवक देखील आहे. त्याला खूप जगायचे आहे. भारत हा असा एकमेव देश आहे जो केवळ अधिभौतिक बाबींपुरताच मर्यादित नाही तर त्याच्या पल्याड असणाऱ्या आध्यात्मिक अधिष्ठानाचे मूर्त आणि सचेतन असे सगुण साकार रूप आहे. आणि त्याचे आपणास कदापि विस्मरण होऊ देता येणार नाही. म्हणूनच, भारताकडे जगाला देण्यासाठी महान असे अनेक संदेश आहेत. त्यासाठीच, राष्ट्राच्या आत्म्याबरोबरच व्यक्तीचा आत्म!देखील महत्वाचा आहे. कारण, त्यातूनच राष्ट्राचे उन्नयन घडणार आहे. “The great are strongest when they stand alone, A God-given might of being is their force- असा सावित्री या आपल्या महाकाव्यात श्री अरविंद निर्वाळा देतात. श्री अरविंदांनी वेळोवेळी कळकळीने सांगितले की बाह्य घटक आपले शत्रू नाहीत. आपले दौर्बल्य, भित्रेपणा , संकुचितता, व्यक्तिगत स्वार्थ हेच आपले शत्रू होत. त्यांचा नि:पात करणे हे आपले ध्येय हवे. त्यासाठीच आपल्या हृदयात आणि मेंदूत भारतमाताच असायला हवी. तिच्यावर निरपेक्ष प्रेम करा. तिची निष्काम सेवा करा. मुलांची मने देशप्रेमाने ओतप्रोत भरा. श्री अरविंद भारताच्या स्वातंत्र्याचे चिंतन करत असतानाच ते अवघ्या मानवकुलाच्या कल्याणाचीही स्वप्ने पाहत असत. त्यांनी आपले चिंतन भारतापुरतेच सीमित न ठेवता त्याला विश्वरूप दिले. त्यांनी पाहिलेली पाच स्वप्ने त्यांच्या अवघ्या मानवकुलाच्या कल्याणाच्या अंतर्मुख करणाऱ्या व्यापक विचारांचे द्योतक आणि निदर्शक आहे. त्यांची पाच स्वप्ने म्हणजे ज्ञानदेवांनी 12 व्य शतकात लिहिलेल्या पसायदानाचेच आधुनिक रूप आहे. टागोरांनी विश्वभारती ची कल्पना प्रत्यक्षात आणली. विवेकानंदांनी युनिव्हर्सल रिलिजन ची वाट चोखाळली. गांधींनी जगाच्या संस्कृतींचे वारे भारतात वाहावेत असा आग्रह धरला. राजाराम मोहन राय यांनी मी भारताचा, भारत जगाचा आणि जग सर्वांचे असे निक्षून अंगितले. या सर्व थोर विभूतींनी जातीयता, प्रांतीयता , मनाचे कोतेपण, स्वार्थ या सर्वांचा अव्हेर केला. निकराने विरोध केला. भारताचे स्वातंत्र्य, आशियाचा उदय, जगाची एकता आणि अखंडता , भारताने जगाला द्यावयाची आध्यात्मिक भेट आणि त्यातून अवघ्या मानवजातीचे होणारे उन्नयन हीच ती पाच स्वप्ने होत. श्री अरविंदांनी जे केले त्यात सार्थप्रेरितता आणि आत्मकेंद्रितता नव्हती. त्यांनी जे केले ते समाजासाठी,राष्ट्रासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्याच उन्नयनासाठी. भारतीयांनी उठावे , कार्यास लागावे आणि स्वातंत्र्यप्राप्ती बरोबरच आपले पुनर्वैभव प्राप्त करावे हाच त्यांचा निदिध्यास होता, कळवळा होता आणि सांगावादेखील होता. त्यासाठी त्यांनी स्वतः कृती केली आणि हजारोंना प्रेरणा दिली. त्यांच्या मनी-मानसी भारतमातेची भक्ती चेतवली. युवकांना कार्यतत्पर केले. त्यांच्या हाती स्वदेशरक्षणाचे निशाण दिले. स्वातंत्र्यप्राप्ती ही दीर्घकालीन प्रक्रिया होती आणि श्री अरविंद त्यातील अग्रदूत ठरले. श्री अरविंदांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून तशी कृती झाली तर मिळालेले स्वातंत्र्य नक्कीच वरदान ठरेल असे वाटते.
शेवटी, एवढच-
जेथे मन निर्भय, ज्ञान मुक्त आणि मस्तक विमुक्त असेल….
जेथे जग क्षुद्रतेच्या भिंतींनी भेगाळले नसेल …
जेथे विमल विचारांची विशुद्ध गंगा रूढींच्या वैराण वाळवंटात विराम पावली नसेल…
जेथे अदम्य प्रयत्न पूर्णत्वाच्या आलिंगनासाठी आसुसलेला असेल ..
जेथे शाब्द सत्याचाच चाळणीतून प्रकट होतील .. जेथे शब्द आणि कृती हातात हात घालून मार्गक्रमण करतील .. अशा दिव्य लोकी , माझ्या देवा , माझ्या देशाला घेऊन जा..
प्रा. वेदांत कुलकर्णी 9970662488
आपल्या विद्यार्थ्यांना प्रगल्भ होत जाताना पाहणे यासारखा आनंद नाही. वेदांत अभिनंदन !
अभिनंदन !!! लेख वाचनीय आहे. श्री.अरविंदांच्या या पैलूवर मराठीतून लेख आवडला.