श्री अरविंदांच्या जीवनातील श्रीकृष्णाचे स्थान !

Spiritual Map of India
Sri Aurobindo Ashram Pondicherry

मनाचे सामर्थ्य जोपासणे आणि या सामर्थ्याने पोलादी शरीर घडवणे ही भारताची सवय. मनाच्या अफाट सामर्थ्याने देहदंड सोसण्याची ताकद, पोलादी शरीर घडवण्याची ताकद इथल्या लोकांमध्ये आली. या मन:शक्तीने देशभक्ती करणे आणि विश्वकल्याण साधणे हा भारताचा स्वभाव. भारत म्हणजे केवळ एक भूभाग किंवा राजकीय नकाशा नव्हे. ती साक्षात माता आहे. जिच्या स्वातंत्र्यासाठी, जिच्या अस्तित्वासाठी,   जिच्या विकासासाठी भारतीय प्राणार्पण करत आलेले आहेत.

एका साध्या सत्यासाठी

देता यावे पंचप्राण……

ही इथली धारणा आहे.

सत्याची उपासना करून, आंतरिक सौंदर्याची अभिव्यक्ती करणारा देश म्हणजे भारत ! आंतरिक प्रकाशात रत राहून, वादळवाऱ्यातही जगासाठी नंदादीपाची भूमिका बजावणारा देश म्हणजे भारत! अनेकविध धर्म संस्कृतींना स्वीकारत, सामावून घेत मानवजातीला उन्नत करणारा देश म्हणजे भारत ! आक्रमणाची मनीषा न बाळगणारा, मात्र कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता असणारा देश म्हणजे भारत ! जीवनाची असीम शक्ती कर्तृत्वाच्या माध्यमातून व्यक्त करणारा आणि, ‘नाहं कर्ता, हरि: कर्ता!’ अशी दृढ श्रद्धा बाळगत, ईश्वरी शक्तीपुढे नतमस्तक होणारा , समर्पित होणारा देश म्हणजे भारत! सत्य, सौंदर्याची उपासना करणारा, मांगल्याची धारणा बाळगणारा आणि ईश्वराची अभिव्यक्ती करणारा देश म्हणजे भारत! अवघ्या जगाचा अनुभव घेऊन, नकळत्या वयापासून जगाचे संस्कार पचवून, ज्यांच्या व्यक्तित्वामधले भारतीयत्व चिरंतन प्रेरक राहिले,  त्या श्रीअरविंद घोष यांच्या जीवनातील श्रीकृष्णाच्या स्थानाचा शोध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न!

Sri Krishna & Sri Aurobindo

भारतामध्ये परतलेले श्रीअरविंद सयाजीराव गायकवाड महाराजांच्याकडे लौकिकदृष्ट्या नोकरी करत होते. प्रशासकीय कामकाज, संपादक, प्राध्यापक अशा अनेकविध भूमिका निभावताना आपला स्वधर्म त्यांना गवसला. बंगालच्या फाळणीने त्यांना साद घातली. मातृभूमीच्या ही साद जाणून घेत, प्रचंड सामर्थ्यशाली असा प्रतिसाद श्रीअरविंदांनी दिला. आपलं सर्वस्व त्यांनी राजकारणाच्या पायाशी ओतलं. श्रीअरविंद म्हणजे एक व्यासंग, एक विलक्षण स्पष्टता, एक सामर्थ्यशाली निर्णय, एक जबरदस्त प्रेरणा युवा पिढीच्या पाठीशी उभी राहिलेली दिसून येते. त्या युवा पिढीसाठी  मायभूमी ही देवता होती. मातृभक्ती हा धर्म होता. ‘वंदे मातरम्’ हा मंत्र होता. सशस्त्र उठाव हा मार्ग होता. त्यांना श्रीअरविंद मार्गदर्शन करत होते परंतु सरकारच्या कचाट्यात कुठेही सापडू शकत नव्हते. 

मात्र मुज्जफरपूरच्या माणिकतोळा उद्यानातील बॉम्ब प्रकरणात श्रीअरविंदांना पुराव्याशिवायच पकडण्यात आले. त्यांना हातकड्या घालून अलीपूर जेलमध्ये ठेवण्यात आले. ०५ मे १९०८ ते ०६ मे १९०९ श्रीअरविंद या कारागृहात राहीले. लौकिकदृष्ट्या श्रीअरविंदांना अटक झाली आणि वर्षभरानंतर ते सुटले. पण या वर्षभराच्या काळात त्यांच्या जीवनात जे रूपांतरण घडलं त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे पालटलं. या कारावासाच्या अंतिम फलश्रुतीचे वर्णन स्वतः श्रीअरविंद पुढील शब्दात करतात The one result of the wrath of the British government was my attainment of God……Little did I know that day (the day of his arrest) would see the close of one chapter of my life and opening of another…. Little did I know that I should not be the same old familiar Aurobindo Ghosh but a new man with a new character, a new intellect, a new life, a new mind, charged with a new work, when I should re enter my field of work.

या खटल्यात आपली निर्विवादपणे सुटका होणार हे ते जाणत होते. या काळात  श्रीअरविंद गीतेचा अभ्यास करीत होते. ते गीतेचे केवळ वाचक नव्हते. ते गीता अनुभवणारे साधक होते. कर्म, भक्ती व योग हा गीताप्रणित मार्ग त्यांनी अनुसरला. त्यांचे ‘गीतेवरील निबंध’ हा ग्रंथ आपल्यालाही हा मार्ग दाखवतो. ज्यानी जगाला गीता सांगितली त्या वासुदेवानं चराचराला व्यापून उरणार आपलं विश्वरूप अरविंदांना दाखवलं. अरविंद कृतार्थ झाले, अनुभवसिद्ध झाले.

अलीपूर येथील कारागृहात सतत पंधरा दिवस श्री अरविंदांना स्वामी विवेकानंदांचं प्रत्यक्ष सान्निध्य आणि मार्गदर्शन लाभले. श्री अरविंद यांच्या तत्वज्ञानातील सुपर माईंड ही देदीप्यमान कल्पना त्यांना प्रथम स्वामीजींनीच सूचित केली. श्रीअरविंद त्याबद्दल लिहितात – it was the spirit of Vivekananda who first gave a clue in the direction of the supermind…. This clue led me to see how the Truth – consciousness works in everything. स्वामी विवेकानंदांनी अवघ्या मानवजातीच्या भवितव्याचा विचार अरविंदांपुढे ठेवला. शिशिरकुमार मित्र लिहितात, Vivekanand declared in the accents of God that only a spiritual civilization from India could save mankind from itself. She must therefore rise and be her true self. स्वामी विवेकानंद आणि श्रीअरविंद हे दोघेही अध्यात्मप्रधान राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. श्रीअरविंद अलीपूरला असताना हे सर्व विश्व वासुदेवमय असल्याचं त्यांनी पाहिलं. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र असणारं ब्रह्म सगुण स्वरूपात त्यांनी अनुभवलं. हा वासुदेव दर्शनाचा सोहळा श्री अरविंदांनी उत्तरपारा येथे केलेल्या आपल्या भाषणात सविस्तरपणे व्यक्त केलेला आहे. ‘मुक्तिगाथा महामानवाची’ या चरित्रात प्राचार्य शिवाजीराव भोसले या अनुभवाचे सविस्तर वर्णन करतात.  

दिनांक ०६ मे १९०९ रोजी अरविंद सुटले. ३० मे रोजी उत्तरपारा येथील धर्मरक्षिणी सभेच्या एका कार्यक्रमास श्री अरविंद गेले होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, “मी कारागृहाबाहेर आलो. मला सारे जग बदललेले दिसले. ज्यांनी मला सर्वकाळ सोबत केली ते माझे सांगाती मंडालेच्या कारावासात स्थानबद्ध झाले आहेत. …….आपला उद्वेग व्यक्त केल्यावर श्री अरविंद यांनी आपल्या कारागृह यात्रेचा तपशील सांगितला आपण अटकेत कसे पडलो, सुरुवातीस मनातून कसे कष्टी झालो, ईश्वरी कृपेविषयी मनातून कसे साशंक झालो, मग जिवाच्या आकांताने भगवंताची करुणा कशी भाकली आणि शेवटी आपला धावा ऐकून द्रवलेल्या वासुदेवाने आपल्याला कसा प्रतिसाद दिला हे अरविंदांनी सभेस सांगितले. हे सारे अनुभवाचे बोल होते. एका वेगळ्या विश्वातून येणारी ही अमृतधारा होती. श्रीअरविंद सांगत होते, “माझा कारागृहवास हा विधात्याच्या योजनेस अनुसरून घडला. माझी मुक्तता ही देखील त्याच्याच कृपेने घडली, मी भगवंताला कौल लावला आणि आदेश मागितला. त्यानं तो दिला. तो म्हणाला, “सनातन धर्माची श्रेष्ठता जगाला पुन्हा एकदा पटवून देण्यासाठी मी या देशाचे उत्थान घडवीत आहे. प्राचीन ऋषीमुनींचा, अवतारी पुरुषांचा साधुसंतांचा हा धर्म हा माझ्या स्फूर्तीचा अविष्कार आहे. त्याचा पुरस्कार हे तुझं कर्तव्य आहे. सनातन धर्म हा अखिल मानवजातीचा धर्म आहे. तो भारतात उदय पावला असला तरी तो अवघ्या विश्वाचा धर्म आहे. यासंदर्भात सनातन धर्माच्या नित्यस्वरूपाचे विवेचन करताना अरविंद म्हणतात, “सनातनधर्म हा एखादा अंध व संकुचित संप्रदाय नव्हे. सोवळ्यानी नटलेला आणि भेदांनी फाटलेला तो पोटभरू पुराणिकांचा धर्म नव्हे. भौतिकशास्त्राचे गुह्य आत्मसात करणारा आणि भविष्यकालीन संशोधनाचा वेध घेणारा सनातन धर्म हाच उद्याचा धर्म आहे. त्याच्या उदरात उद्याचे ज्ञानविज्ञान व तत्त्वज्ञान या विचारशाखा विसावतील.

श्रीअरविंद यांचे प्रयत्न ज्या दिव्यत्वाचा प्राप्तीसाठी होते ते दिनांक २४ नोव्हेंबर १९२६ रोजी प्राप्त झाले. सिद्धी दिन म्हणून हा दिवस सर्वपरिचित आहे. यादिवशीच्या ध्यानप्रसंगी हजर असणारी हडसन दत्त म्हणाली, “आज भूमंडल कृतार्थ झाले. आज दिव्यत्वाचे भूतलावर अवतरण झाले.” या दिवशी नेमके काय घडले याचे वर्णन श्री अरविंद करतात The 24th November was the descent of Krishna into the physical. Krishna is not the supramental light. The descent of Krishna would mean the descent of the overmind, preparing the descent of the supermind. श्री अरविंद यांच्या दृष्टीने ही घटना शुभसूचक होती. अतिमानसाच्या आगमनाची आणि अवतरणाची ती निशाणी होती. या दिवसापासून श्रीअरविंद यांनी पूर्ण एकांतवास पत्करला. आपल्याच अंतर्यामी ते स्थिरावले. या एकांतवासापूर्वी त्यांनी आश्रमवासीयांना सांगितले,  माझे साधन अजून अपूर्ण आहे ते पूर्णावस्थेत नेण्यासाठी मला भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत. ‘ हे प्रयत्न त्यांच्या ‘सावित्री’  या ग्रंथातून योगदर्शन देत जगाला मार्गदर्शक होतात.

वृंदा देशपांडे – जोशी 

1 thought on “श्री अरविंदांच्या जीवनातील श्रीकृष्णाचे स्थान !”

  1. Vrunda Ashay Joshi

    शब्दांना चित्र किती अर्थपूर्ण करतात याचा सुरेख प्रत्यय सोहमने दिला. या संकेतस्थळाचा तंत्रज्ञ सोहम खांबेटे याचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार !

Comments are closed.