– श्रीअरविंद
श्री अरविंद घोष यांच्या ‘माता’ या मराठीतून अनुवादित झालेल्या पुस्तकाचा परिचय आपण करून घेत आहोत. हे पुस्तक मूळ इंग्रजी भाषेमध्ये The Mother या नावाने 1928 मध्ये प्रकाशित झालेले होते. या पुस्तकामध्ये समाविष्ट असलेली एकूण 6 प्रकरणे ही पहिल्यांदा 1927 मध्ये लिहिली गेली होती. पहिले प्रकरण हे एक संदेश म्हणून लिहिलं गेलं होतं, तर दोन ते पाच ही प्रकरणे पत्र म्हणून लिहिली गेली होती. सगळ्यात शेवटचं आणि दीर्घ असलेलं 6 वे प्रकरण हे एका बुकलेटमध्ये समाविष्ट करण्यासाठी लिहिला गेला होता. Message, letters & The mother या नावाने हे पुस्तक सर्वप्रथम 1928 मध्ये प्रकाशित झालं होतं. आज हे इंग्लिश पुस्तक इ-बुक स्वरूपात तर त्याचा हिंदी अनुवाद ‘माता’ या शीर्षकाने Pdf स्वरूपात वाचण्यासाठी उपलब्ध आहे.

मराठी पुस्तक ‘माता’ याचा अनुवाद भा. द. लिमये आणि विमल भिडे यांनी केला. याची प्रथम आवृत्ती 1981 मध्ये दुसरी 1986 मध्ये तिसरी आवृत्ती 1994 मध्ये निघाली. एकूण 71 पानांचं छोटेखानी असं पुस्तक आहे, जे साधनेची दिशा नेमकेपणाने स्पष्ट करते. श्री अरविंद आश्रम ट्रस्ट पोंडीचेरी यांनी ते प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकावर आधारित ‘दिव्य माता’ हे पुस्तक थोड्या सोप्या भाषेमध्ये 2009 मध्ये आश्रमातर्फे प्रकाशित करण्यात आले.

‘माता’ या पुस्तकामध्ये सहा प्रकरणे आहेत. या सहा प्रकरणांमध्ये विशद केलेले विचार खाली नोंदवत आहे.
प्रकरण १
ज्या दोन शक्तींच्या संयोगाने साधनेचे महान व कठीण उद्दीष्ट पूर्ण होऊ शकते अशा दोन शक्ती जगामध्ये कार्य करत असतात त्या म्हणजे खालून आवाहन करणारी दृढ आणि अस्खलित अभीप्सा आणि तिला वरून प्रतिसाद देणारी सर्वोच्च भगवत्कृपा होय. सर्वोच्च भगवत्कृपा कोठे कार्य करू शकेल हे स्पष्ट करताना श्री अरविंद सांगतात, जेथे प्रकाश आणि सत्य असतील अशा परिस्थितीतच केवळ भगवत्कृपा कार्य करेल. असत्य आणि अज्ञान यांनी तिच्यावर लादलेल्या परिस्थितीत त्यांच्या अटीनुसार ती मुळीच कार्य करणार नाही. अन्यथा भगवत्कृपेचा स्वतःचा उद्देशच विफल होईल. त्यासाठी अत्यावश्यक प्रकाशमय आणि सत्यमय परिस्थिती म्हणजे संपूर्ण व अंतःकरणपूर्वक समर्पण.
हे समर्पण परिपूर्ण होण्यासाठी केवळ दिव्यशक्तीप्रतच स्वतःला खुले करून वरून अवतरणा-या सत्याचाच एकसारखा आणि सर्वांगानी स्वीकार केला पाहिजे. पार्थिव प्रकृतीवर सत्ता गाजवणाऱ्या मन, प्राण आणि शरीर यांच्या शक्ती व आभासात्मक मायावी रूपे यांच्या असत्याचा पदोपदी आणि सर्वस्वी त्याग केला पाहिजे. समर्पण संपूर्ण होऊन या समर्पणाने अस्तित्वाची सर्व अंग अंकित करावीत. भक्ती आणि समर्पणाच्या आवरणाखाली वासना, अहंकार युक्त हक्काच्या मागण्या, आणि प्राणिक वासनाप्रेरित आग्रह नसावेत. भगवंताचे जिवंत जागृत अस्तित्व तुम्हाला तिथे प्रस्थापित करायची इच्छा असेल तर तुम्ही देवालय स्वच्छ आणि शुचिर्भूत ठेवलंच पाहिजे. संकल्पातील सत्यता आणि समर्पणातील अपूर्णता भगवत शक्तीला दूर ठेवते. आपल्यातलं असत्य किंवा तमोग्रस्त काय आहे ते शोधून काढून त्याचा चिकाटीने सतत त्याग करत राहावा. सत्य-असत्य, प्रकाश-अंध:कार, समर्पण-स्वार्थ या परस्परविरोधी गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. समर्पण खरं आणि परिपूर्ण असलं तरच भगवत शक्ती मदत करते.
जोपर्यंत तुमचं रूपांतर अपरिवर्तनीय, वज्रलेख असं होत नाही तोपर्यंत तुमचं आत्मदान परत घेण्यास तुम्ही स्वतंत्र आहात. मात्र त्याचे अध्यात्मिक परिणाम भोगावयास तुम्ही तयार असलं पाहिजे. तुमचं समर्पण स्वेच्छा पूर्वक आणि स्वयंस्फूर्त असलं पाहिजे. ते जिवंत व्यक्तीचं समर्पण असलं पाहिजे. कळसूत्री बाहुलीच किंवा यांत्रिक उपकरणाचे नकों. तामसिक निष्क्रियता म्हणजे खरंखुरं समर्पण नव्हे. सहर्ष, सामर्थ्यपूर्ण आणि साहाय्यप्रद अशी शरणागती अपेक्षित आहे. ज्ञानदृष्टी संपन्न सत्यानुयायाची, तमोग्रस्तता आणि असत्य यांच्याशी झुंजणाऱ्या आंतरयोद्ध्याची व भगवंताच्या एकनिष्ठ सेवकाची आज्ञाधारकता अपेक्षित आहे. ही वृत्ती टिकवू शकणाराच अविचल श्रद्धा राखू शकतो आणि अग्निदिव्यातून पार पडून परमोच्च विजय व महान समग्र रूपांतर याप्रत पोहोचू शकतो.
प्रकरण २
विश्वामधील सर्व कृतीमागे भगवंतच त्याच्या शक्ती द्वारा विद्यमान असतो. पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो. कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जिवाच्या अहंकाराद्वारा कार्य करत असतो. योगामध्येही भगवंत हाच साधक आणि साधन असतो. जो पर्यंत कनिष्ठ प्रकृती कार्यकारी असते तोपर्यंत साधकाच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता राहतेच. हा आवश्यक व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, त्याग आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय. अभीप्सा जागरूक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे. कनिष्ठ प्रवृत्तीच्या सर्व गती वृत्तींचा त्याग करता आला पाहिजे. निश्चल नीरव मनामध्येच खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळते. अभीप्सा आणि त्याग यांचा मार्ग अनुसरत अधिकाधिक दिव्य होत जाणा-या देहात प्रकाश, शक्ती, आनंद यांचं खरं स्थैर्य प्रस्थापित होईल. आत्मवंचना करणारे तामसिक समर्पण मुक्तता व पूर्णत्व यांच्याकडे घेऊन जाणार नाही.
प्रकरण ३
भगवती मातेची कृपा व श्रद्धा, सत्यता, समर्पण यांनी युक्त अशी आंतरिक स्थिती या दोन गोष्टी नित्य निरंतर एकत्रित राहिल्या तर जीवनाला संरक्षण कवच लाभते. श्रद्धा शुद्ध, प्रांजळ, परिपूर्ण असावी. अहंकारी श्रद्धा नको. केवळ दिव्य चेतनेचे पावित्र्य, शक्ती, प्रकाश, विशालता, स्थिरता आणि आनंद यांचीच इच्छा धरा. तुम्ही स्वतःला भगवंतास देऊन टाकता तेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे देऊन टाका. मातेच्या कृपा संरक्षणाच्या केवळ स्पर्शानेही अडचणीचे सुसंधीत, अपयशाचं यशात आणि दुर्बलतेचं खंबीर सामर्थ्यात रूपांतर होऊ शकतं.
प्रकरण ४
पैसा, धन ही एका विश्व शक्तीची दृश्य खूण आहे. सत्ता, धन आणि कामवासना या तीन शक्तींचे मानवी अहंकार आणि असुर यांना आकर्षण असते. धनशक्ती ही भगवंताच्या मालकीची आहे. ती भगवंतासाठी पुन्हा जिंकून घेणे आणि तिचा दिव्य जीवनासाठी दिव्य रीतीने उपयोग करणं, हा साधकाच्या दृष्टीने अतिमानसिक मार्ग आहे. संपत्ती ही शक्ती आहे, ती मातेसाठी जिंकून घेऊन तिच्या सेवेसाठी लावायची आहे, अशी भावना हवी. आपण संपत्तीचे विश्वस्त आहोत, मालक नव्हे. लोकांजवळ संपत्ति आहे म्हणून केवळ ते आदरणीय आहेत असं मानू नका. त्यांचा भपका, सत्ता, प्रभाव यांची स्वतःवर छाप पडू देऊ नका. मनाची समता, आग्रही मागणीचा अभाव, संपूर्ण समर्पण ही धनदोषांपासून मुक्त असल्याची लक्षणे आहेत. धनदोषांपासून तुम्ही मुक्त असाल पण त्याचबरोबर त्याविषयी तुमच्या ठिकाणी विरक्ताची निवृत्ती नसेल, तर दिव्य कार्यासाठी धन जिंकून घेण्याची, हस्तगत करण्याची अधिक मोठी शक्ती तुम्हाला प्राप्त होईल.
गरिबी आणि श्रीमंतीतही भगवत इच्छा आणि भगवत आनंद हेच त्याचं सर्वस्व असतं. नि:संकोच आत्मसमर्पण केलेले लोकच सर्वश्रेष्ठ शक्तीसाठी विशुद्ध आणि सामर्थ्यवान वाहक होऊ शकतात.
प्रकरण ५
दिव्य कर्मे करणारा खरा कार्यकर्ता होण्यासाठी सर्व वासना आणि स्वतःलाच सर्वस्व मानणारा अहंकार यापासून संपूर्णतः मुक्त होणं अत्यावश्यक आहे. अखिल जीवन हे परमेश्वराला अर्पण केलेला नैवेद्य आणि यज्ञ असे असले पाहिजे. भगवती शक्तीच्या कार्यामध्ये तिची सेवा करणे, तिचा स्वीकार करणे, तिच्या हेतूची परिपूर्ती आणि तिचा अविष्कार करणारे साधन बनणे, हा कर्म करताना तुमचा एक उद्देश हवा. अहंकारी निवडीवर सर्वस्वी भर, वैयक्तिक लाभासाठी सारी लालसा, स्वार्थपरायण वासनेची अटी घालण्याची सारी प्रवृत्ती या गोष्टी स्वभावातून समूळ उपटून टाकल्या पाहिजेत. फलासंबंधी कोणतीच आग्रही मागणी असता कामा नये किंवा प्रतिफल मिळावे यासाठी हव्यास नको. भगवती मातेचा संतोष आणि तुमच्या हातून तिच्या कार्याची परिपूर्ती हेच तुमच्याकरता एकमेव फल होय. आणि दिव्य चेतनेमध्ये तुमची सतत प्रगती होत जाणे आणि स्थिरता, सामर्थ्य व आनंद लाभणे हेच तुमचे एकमेव प्रतिफल होय. सेवेचा आनंद आणि कर्मांच्या द्वारा आंतरिक विकास होत असल्याचा आनंद हा नि:स्वार्थी कार्यकर्त्याला पुरेसा मोबदला आहे.
हळूहळू तुम्ही इतके प्रगत होता की तुमच्या लक्षात येते तुम्ही कार्यकर्ते नाहीत तर साधन आहात. भगवती मातेच्या हाती सर्व काही सोपवताच, तुम्हाला तत्काळ तिचे मार्गदर्शन, आदेश, प्रेरणा आणि निश्चित अशा सूचना प्राप्त होतात. तिच्याशी असे ऐक्य साधल्याने ओढाताण आणि दु:खक्लेश यांनी युक्त अशा अज्ञानी जीवनाची तुम्ही सीमारेषा ओलांडता आणि परत तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या सत्य स्वरूपामध्ये, त्याच्या अगाध शांतीमध्ये आणि उत्कट आनंदामध्ये प्रवेश करता.
हे रूपांतरण घडवून आणले जात असताना अहंकारापासून, सर्व प्रकारच्या विकृतींपासून तुम्ही स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. तुमची श्रद्धा, मन:पूर्वकता, तुमच्या अभीप्सेची शुद्धता, या गोष्टी अबाधित आणि अस्तित्वाच्या सर्व पातळ्या व स्तर व्यापणाऱ्या असाव्यात. या पूर्णत्वाची शेवटची अवस्था येते, तेव्हा तुम्ही भगवती मातेशी पूर्ण एकरूप होता.
प्रकरण ६
(या प्रकरणातील विचारांची नोंद ‘दिव्य माता’ या 2009 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या आधारे करत आहे.)
या विश्वाच्या पलीकडे असणारी म्हणजेच विश्वातीत असणारी जी मूलभूत अशी आदिशक्ती आहे ती विविध स्वरुपात प्रकट झालेली दिसते. परब्रह्माने स्वतःला एकाच वेळी चेतनेच्या ईश्वर व शक्ती या दुहेरी तत्त्वाच्या, पुरुष व प्रकृती या दुहेरी अशा मूर्त स्वरूपात तिच्याच द्वारे या जगामध्ये प्रगट केलेले आहे. दिव्य मातेच्या चार महान रूपांना आपण नावे देतो महेश्वरी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती.

महेश्वरी विचार करणारे मन आणि इच्छाशक्ती यांच्या वरच्या विस्तृत अवकाशामध्ये स्थानापन्न झालेली आहे .महाकालीच्या उंची, जोर आणि ताकद या वैशिष्ट्यपूर्ण शक्ती आहेत. तिच्या ठिकाणी एक दुर्दम्य तीव्रता असते. विजय होण्यासाठीचा जबरदस्त आवेशयुक्त जोर असतो. मर्यादा, बंधन आणि अडथळे यांचे तात्काळ जाऊन तुकडेतुकडे करेल असा दिव्य संहार असतो. सर्वश्रेष्ठ दिव्य मातेची ज्ञान आणि सामर्थ्य या बरोबरच अधिक सूक्ष्म आणि तरल अशी रहस्ये आहेत. ज्या वाचून ज्ञान व सामर्थ्य अपूर्ण राहील, त्याला पूर्णत्व येणार नाही. ते म्हणजे चिरंतन सौंदर्याचा चमत्कार! सर्व विश्वाची नजर खिळवून ठेवणारं मोहक सौंदर्य, आकर्षकपणा यांची मंत्रमुग्ध करणारी जादू असून ती साऱ्या वस्तू, प्रवाह आणि सारे जीवन यांना स्वतःकडे एकत्रितपणे खेचून घेते व धरून ठेवते. महासरस्वती म्हणजे दिव्य मातेच्या कार्याचे सामर्थ्य जे परिपूर्णत्व आणि सुव्यवस्था यांचे चैतन्य होय. कामांची अंमलबजावणी करणे व ती पार पाडणे या क्षेत्रात सर्वात कौशल्यपूर्ण असते. शिवाय ती या वास्तव प्रकृतीच्या सर्वात जवळ असते.
चैतन्याच्या पातळ्यांची चढत्या व उतरत्या स्वरूपाची क्रमवार रचना असते. ती एखाद्या दुहेरी शिडी प्रमाणे खालून वर, वरून खाली जाणारी असते आणि जडत्वाचा निवडीमध्ये जाणिवेच्या पातळ्या लुप्त होत असतात. त्यामुळे प्राण, आत्मा व मन यांचा विकास करून त्यायोगे त्या पातळ्यांची पुन्हा चढण करून त्यांना परमात्म्याच्या अनंततेमध्ये पुन्हा परत न्यायचे असते.
माता हे पुस्तक म्हणजे एक प्रवास आहे, जीवाला परिपूर्णतेची दिशा दाखवणारा!
प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी
‘माता’ पुस्तक पुन्हा एकदा नव्याने वाचताना मला जाणवले , ” हा तर जीवनाला समृद्ध करणारा एक आंतरिक सौंदर्यानुभव आहे. जीवनाशीष देणारा कृपानुभव आहे.” हे मूळ पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे, असे मला प्रामाणिकपणाने वाटते. सुदैवाने ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांमधून ते सहज उपलब्ध आहे.