मीरा अलफास्सा ते माताजी एक प्रवास.

आपण सर्वजण ज्यांना श्री अरविंद आश्रमाच्या माताजी म्हणून ओळखतो त्यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1878 ला पॅरिस येथे मॉरीस आणि मेथिलडे अल्फासा-यांच्या कुटुंबामध्ये मीरा अल्फासा या नावाने झाला. त्यांचे आई-वडील दोघेही बँक क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्यात खरेच अलौकिक प्रतिभा व सामर्थ्य यांचे दर्शन लहानपणी पासूनच दिसत होते. त्यांना पाचव्या वर्षीच हे माहीत होते की “प्रत्येकाने स्वतःवर ताबा अर्थात नियंत्रण मिळवले पाहिजे व इतर गोष्टींचे नुसते गुलाम असू नये”. हे बाळकडू त्यांना त्यांच्या आईने दिले होते ते असे, “तुझा जन्म सर्वोच्च आदर्श प्राप्त करण्यासाठी झाला आहे हे कधीही विसरू नकोस”. या लहान मीरा मध्ये भगवती मातेची विविध लक्षणे अगदी याच वयात दिसू लागली. जसे की सातव्या वर्षी तिने तिच्या वयाच्या दुप्पट असलेल्या एका त्रास देणाऱ्या व्यक्तीला नुसते शारीरिक बळ वापरून हरवले. हे महाकाली शक्तिचे लक्षण होय. दुसरे उदाहरण म्हणजे फाउंटेन ब्लेऊमध्ये उंच शिखरांवर सटकल्यावर अगदी अलगदपणे खाली उतरणे. जसे की तिला वरचेवर कोणीतरी झेलून, सुरक्षितरित्या उतरवले होते. मीरा अल्फासा हिला संपूर्ण 13वे वर्ष रात्री झोपल्यावर योग निद्रेत, शरीरातून वेगळे होऊन, प्रचंड उंचीवर जाऊन, स्वतःला सोनेरी झग्यामध्ये मदतीची अपेक्षा करणाऱ्या, अनोळखी, उपेक्षित असलेल्यांना, मदत करत असल्याचा साक्षात्कार होत असे. त्यांना संगीत व चित्रकलेमध्ये विशेष रुची होती. 1883 मध्ये शिक्षण संपल्यावर ‘अकॅडमीया जूलियन’ नावाच्या प्रतिष्ठित व नामवंत अशा चित्रकला स्टुडिओमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. याच बरोबरीने त्यांनी मानसिक व आध्यात्मिक पातळीवर सुद्धा देवाचे अस्तित्व जाणले व मानवाचे त्याच्यात एकरूप व्हायचे मार्ग त्यांनी ओळखले. त्यांच्या योग निद्रेत अनेक शक्तींनी, त्यांना, त्यांच्या पुढील कार्यासाठी तयार केले. यापैकी जवळपास सर्व जण त्यांना मनुष्य रूपात पुढे भेटले सुद्धा ! ह्या सर्व गुरूंमध्ये एका गुरूंना त्यांनी ‘श्री कृष्ण‘ असे संबोधले. हेच त्यांना पुढील आयुष्यात श्री अरविंद असल्याची खात्री पटत गेली. मीरा यांचा बहुतेक काळ दिव्यत्वाची प्राप्त करण्यात जायचा. यात अनेकदा बाहेरील जगातील घडामोडीतून त्या पूर्णपणे अलिप्त असे. पण नेहमीच त्यांना एका अदृश्य सुरक्षा कवचाचे संरक्षण मिळत असे. एकदा त्यांना एकविसाव्या वर्षी, एका भारतीयाने भगवद्गीता वाचायला सांगितली व श्रीकृष्ण हेच परमात्मा समजून वाचन सुरु करायला सांगितले. यासाठी त्या गृहस्थांनी फ्रेंच भाषांतरीत भगवद्गीतेची एक प्रत देऊ केली. 28 व्या वर्षी त्यांच्या अवतीभोवती Idea नावाचा एक समूह तयार झाला जो अध्यात्म व गुप्त विद्या यांच्यावर चर्चा करीत असे. याच काळात त्या Max थीओ  व त्यांच्या पत्नी आलमा यांना भेटल्या व त्यांचा अल्जेरिया येथील घरी राहून गुप्त विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवून आल्या. थीओ दांपत्य हे गुप्त विद्या मध्ये प्रावीण्य मिळवलेलं खूप मोठं प्रस्थ होतं. त्यांच्याच प्रेरणेमुळे त्यांना पॅरिस ला परत येत असताना त्यांना  त्यांच्या जहाजावर वादळाच्या पडद्यामागील दृष्ट प्रवृत्तींना शांत करता आले. परतल्यावर त्यांनी ‘कॉस्मिक’ नावाचा आणखीन एक गट तयार केला, ज्याचा मुख्य उद्देश, नवी मानव चेतना कशी असेल व एक आदर्श समाज कसा तयार होईल हे चर्चा करणं होते. मीरा यांचे श्रीमान रिचर्ड्स यांनी त्यांना श्री अरविंद यांच्या बद्दल सांगितले व त्यांच्या वर्णनातून त्यांना भेटण्याची, भारतात जाण्याची तीव्र इच्छा त्यांना जाणवली. 1911 ते 1914 या काळात त्यांनी व रिचर्ड्स यांनी श्रीअरविंद यांच्याबरोबर पत्रव्यवहार सुरू ठेवला. 7 मार्च 1914 मध्ये त्यांनी व रिचर्ड्स यांनी पाँडिचेरी मधील श्री अरविंद यांना भेटण्यासाठी पॅरिस सोडले. जहाज होते, जपानी, ‘कागा मारू’- कोलोंबो साठी.

29 मार्च 1914 रोजी पाँडिचेरी मध्ये प्रवेश घेताना त्यांना प्रकाशाचा खूप मोठा स्त्रोत दिसला आणि त्याचे केंद्रबिंदू शहराच्या मध्यवर्ती दिसले. हीच श्री अरविंद ह्यांची चेतना होती. या केंद्रस्थानी पोहोचल्यावर त्यांना त्यांच्या योगनिद्रातील श्रीकृष्ण अर्थात श्री अरविंद दिसले आणि ते पक्के झाले. त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी तत्क्षणी जाणले की पाँडिचेरी हीच त्यांची कर्मभूमी व त्यांचे पुढील कार्य श्री अरविंदांबरोबर असेल.

त्यांच्या पाँडिचेरी येथील प्रथम वास्तव्यामध्ये त्यांनी ‘आर्य’ या श्री अरविंद यांच्या नियतकालिका साठी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. या ‘आर्य’ मधून श्री अरविंद त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन व टिपण्या देत असत. याच बरोबरीने मीरा यांनी लेखा-विभाग काटेकोरपणे सांभाळले . दरम्यान ‘द न्यू आयडिया’ या गटाची देखील त्यांनी  स्थापना केली. हा गट त्या सर्वांसाठी खुला होता ज्यांना अध्यात्मिक दृष्टीकोन व त्याची सर्वात उच्च प्रतीची प्राप्ती त्यांच्या दैनंदिन आयुष्यात मिळवायची होती. 1915 मध्ये त्या फ्रान्सला परतल्या परंतु तिथे गेल्यावर त्या प्रचंड आजारी पडल्या. तरीही आध्यात्मिक कार्यासाठी त्यांनी बळ व शक्ती एकत्रित करून जपान हा देश गाठला. त्या ह्या देशाच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्या व तिथे त्यांना अनेक आध्यात्मिक अनुभव आले. मीरा अल्फासा, 24 एप्रिल 1920 ला पॉंडेचरी मध्ये पुन्हा आल्या, त्या नेहमीसाठीच. या वेळी त्यांची प्रचंड योग साधना झाली होती व त्यांनी खूप प्रगती देखील केली होती. त्यांच्या येण्याने श्री अरविंदाना मानणाऱ्या व त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्वच साधकांना योग्य पद्धतीने साधना करण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. हीच श्री अरविंद आश्रमाची सांकेतिक सुरुवात होय. 24 नोव्हेंबर 1926 रोजी दिव्य चेतनेचे श्री अरविंद ह्यांच्या शरीरात अवतरण ह्या महाकार्याची सिद्धी प्राप्त झाल्यावर श्री अरविंदांनी एकांतवासात जायचा निर्णय घेतला. हे पाऊल अतिमानसावर लक्ष केंद्रित करण्यासाठी गरजेचे होते. त्यांनी आश्रमाची संपूर्ण जबाबदारी माताजींकडे सोपवली. यानंतर आश्रमात प्रचंड वेगाने नवीन साधकांची भरती होऊ लागली व अनेक लोक आश्रमाच्या कार्यात मदत करू लागले. आश्रमाच्या बारीक-सारीक गोष्टी सुद्धा आता माताजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या.श्री अरविंद आश्रमाची स्थापना 1926 मध्ये माताजींच्या मार्गदर्शनाखालीच 24 साधकांपासून झाली. आज सोळाशे पेक्षा अधिक मोठ्या कुटुंबात त्याचे रुपांतर झाले आहे. यामध्ये 400 ते 500 विद्यार्थी व काही भक्त मंडळींचा विचार केला तर एकूण पॉंडिचेरी शहरात हीच संख्या दोन ते तीन हजार इतकी होईल. आश्रमाचे व्यवस्थापन श्री अरविंद आश्रम ट्रस्ट बघते, ज्याची स्थापना माताजींनी 1955 मध्ये केली. आश्रमात 80 विभाग आहेत ज्यात शेती उद्यान-बाग, आरोग्य-चिकित्सा, गेस्ट हाऊस आणि अभियांत्रिकी असे बरेच विभाग आहेत. 

श्री अरविंदांनी डिसेंबर 1950 मध्ये त्यांच्या पुढील कार्यासाठी देह ठेवला व 1956 मध्ये 26 फेब्रुवारी रोजी अतिमानस पृथ्वीतलावर अवतरीत झाले. माताजींनी अतिमानसिक प्रकाश, शक्ती व चेतना यांना पृथ्वीकडे वळवले होते. संपूर्ण मानवजातीसाठी. 1952 मध्ये माताजींच्या मार्गदर्शनाखाली श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन ची सुरुवात झाली व त्या आश्रमातील लहान मुलांचे वर्ग घेण्यात गर्क झाल्या. या काळात त्यांनी या सर्व मुलांना फक्त शैक्षणिक नाही तर खेळ- क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यांमध्ये भाग घ्यायला देखील प्रोत्साहन दिले. काहीच काळात आश्रमातील विविध विभागांमध्ये प्रगती झाली व त्यांची कार्यपद्धती माताजींनी ठरवून दिली. आश्रमाच्या आतील व बाहेरील साधकांची संख्या वाढत गेल्यामुळे माताजींनी, 1960 मध्ये श्री अरविंद सोसायटीची स्थापना केली. याच्या त्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट म्हणून कार्यरत राहील्या . Auroville  या स्वयं-संपूर्ण, जागतिक, प्रयोगशील समाजाच्या स्थापनेमध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे. माताजींनी त्यांचा देह 17 नोव्हेंबर 1973 मध्ये ठेवला व त्यांची समाधी श्री अरविंद यांच्या समाधी वर प्रस्थापित केली गेली आहे. आजही समाधी हे भारतातील व जगभरातील अनेक साधकांसाठी व भक्तांसाठी मार्गदर्शन मिळण्याचे स्थान आहे.