सिद्धी दिनाचे महत्त्व.

श्री अरविंदांच्या पूर्णयोगाच्या संदर्भात 24 नोव्हेंबर 1926 या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. क्रांतिकारक श्री अरविंद घोष यांचे बाह्य जीवन व योगी श्रीअरविंद यांचे आंतरिक जीवन यात 1910 पासून आमूलाग्र बदल घडून आला.प्रथम कलकत्त्याहून ‘चंद्रनगरला ‘जा व नंतर ‘ पॉंडिचेरी’ला जा अशा आंतरिक आदेशांनी त्यांनी आपले संपूर्ण जीवन पूर्णपणे ईश्वराच्या स्वाधीन केले. बडोदया पासून सुरू झालेली योगसाधना व अलिपुर कारागृहातील श्रीकृष्ण दर्शन यातून प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टीने त्यांनी हे ओळखले की त्यांच्या जीवनाचा कर्ता-करविता हा सर्व काही परमेश्वरच आहे. अशा मिळालेल्या संकेतातून त्यांचे यापुढील कार्य ध्यानधारणेच्या माध्यमातून आंतरिक पातळीवर करण्याचे ठरवून एका दृढनिश्चयाने ते पाँडिचेरीला तपस्येच्या गुहेत शांतपणे स्थिरावले.
पॉंडिचेरीला त्यांच्याबरोबर त्यांचे 5-6 सहकारीच आले होते. श्रीअरविंद दिवस-रात्र योग साधनेतच घालवीत असत. त्यांना भेटणाऱ्यांची संख्याही मर्यादितच होती. ब्रिटिश सरकारची त्यांच्यावर सातत्याने बारीक नजर होती.कसेही करून त्यांना पुन्हा कुठल्या तरी खटल्यात गुंतवण्याचे कट तयार होत होते. अशा बाह्य वातावरणात देखील श्रीअरविंदांच्या योगसाधनेत खंड पडला नाही. ती चालूच होती.
मुळात श्रीअरविंदांची विचारश्रेणी शोधाच्या शेवटापर्यंत जाण्याची व एका प्रकारे क्रांतिकारक पद्धतीची असल्यामुळे राजकारणात ते क्रांतिकारक होते तसे अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांनी क्रांती केली. अध्यात्मात युगानुयुगे चालत आलेल्या साधनेला नवे वळण लावले. योगमार्गातील विविध मार्गाचा अवलंब केला व या सर्वांचा समन्वय साधून पूर्णयोगाचे तत्वज्ञान मांडले. पूर्णयोगाचे उद्दिष्ट व्यक्तिगत मुक्ती नसून सामूहिक जीवनात चेतनेचा विकास करणे हा नवा अर्थ योगाला दिला. आरोहण व अवरोहणाच्या प्रक्रियेतून मनाच्या उच्चतम पातळी पर्यंत मन उन्नत होऊ शकते व जगाचे रहस्य उलगडून समस्या सोडविल्या जाऊ शकतात हे त्यांनी प्रतिप्रादित केले.
1910 ते 1950 या चाळीस वर्षाच्या कालखंडाची दोन भागात विभागणी केल्यास पहिला टप्पा 1910 ते 1926 असा करता येईल व त्यानंतर चा कालखंड.या दोन्ही कालखंडात अनेक महत्त्वाच्या घटना घडत होत्या. या सोळा वर्षात श्री अरविंद साधकांना भेटत असत व त्यांच्या पत्रांना जाणीवपूर्वक उत्तरे देऊन त्यांचे शंकासमाधान ही करीत असत.
एक एक पाऊल पुढे पडत होते.त्यातील पहिल्या कालखंडातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे प्रथमच 29 मार्च 1914 ला फ्रान्सच्या मीरा रिचर्ड(माताजी)या आंतरिक ओढीने श्रीअरविंदांना भेटण्यासाठी भारतात आल्या.या भेटीतच त्यांनी ओळखले की त्यांना योगात आंतरिक पातळीवर जी व्यक्ती मार्गदर्शन करीत होती ते कृष्ण म्हणजेच श्रीअरविंद होय. या पहिल्या भेटीतच माताजींनी मनोमनी असे अनुभवले की आध्यात्मिक क्षेत्रात यापुढील कार्य श्री अरविंदांबरोबरच होणार आहे. याच्या पूर्ततेसाठीच त्या 24 एप्रिल 1920 ला नेहमीसाठी पॉंडिचेरीला येऊन दाखल झाल्या. दोन वर्षाच्या कालखंडानंतर 1922 पासून हळूहळू श्रीअरविंद व इतर साधकांची सर्व व्यवस्थेची जबाबदारीदेखील त्यांनी स्वतःकडे घेतली.
या बदलामुळे सर्व साधकांच्या साधनेत सातत्य व दिशा मिळत गेली. साधना चालूच होती पण त्यांनी अपेक्षित असा टप्पा गाठला नाही हे त्यांच्या 1920 मध्ये त्यांच्या लहान भाऊ बारींद्र ला लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते. ते लिहितात “अंतरंगात असलेल्या गुरूने मला माझा मार्ग पूर्णपणे दाखवला. अनुभवाद्वारे त्याचा ते विकास करून घेत आहेत पण अजून पर्यंत ते पूर्णतेस गेलेले नाही. तूर्त मी इतकेच सांगू शकतो की समग्र ज्ञान, कर्म व भक्ती यांचे ऐक्य घडवून आणणे आणि मनाच्या पातळीवर वरून विज्ञानाच्या अतिमानसिक(super mind) स्तरावर त्याला अधिष्ठित करणे हे माझ्या समग्र योगाचे मूलतत्व आहे”
अशा या साधनामय वातावरणात 1926 ऑगस्टपासून सायं चर्चेतून जे निष्कर्ष निघत होते त्यावरून अतिमानस तत्वाच्या अवतरणासाठी मनाच्या उच्चतर भूमिकेवरचे एखादे तत्त्व अवगत होण्याची आवश्यकता स्पष्ट होत होती. या मध्यस्थ तत्वाचा उल्लेख श्रीअरविंद अधिमानस (over mind) या नावाने करीत असत. सायं संवादात एकदा श्रीअरविंद म्हणाले भौतिक पेशींनी उन्मुख व्हावे यासाठी मी सारखा प्रयत्न करत राहिलो आहे. पण त्याला अवचेतने कडून सातत्याने विरोध होत राहिला आहे. अशाप्रकारे प्रकाशाच्या अवतरणाच्या चर्चेतून साधक मंडळींची उत्कंठा दिवसेंदिवस वाढू लागली होती.
अखेर तो शुभ दिवस उजाडला.24 नोव्हेंबर 1926 रोजी संध्याकाळी माताजींनी सर्व साधकांना अचानक निरोप पाठवून ध्यान स्थळी एकत्रित होण्यास सांगितले. सर्वजण आपापल्या जागी येऊन बसले. सर्वत्र निशब्द वातावरण होते. ध्यान स्थानी पाठीमागे एका रेशमी पडद्यावर तीन सर्प चित्रित केले होते. एका चिनी समजुतीप्रमाणे हे तीन सर्प (ते पृथ्वी, मन आणि आकाश यांचे सूचक होते) जेव्हा एकत्र येतात तेव्हाच दिव्य सत्य पृथ्वीवर अवतरित होते. अशा वातावरणात धीम्या गतीने श्री अरविंद व माताजी यांचे आगमन झाले .वातावरण एकदम विद्युत लहरींनी भारून गेले. कोणी काहीच बोलले नाही. शांत निश्चल निरवतेत 45 मिनिटे ध्यान झाले. त्यानंतर प्रत्येक साधकाला त्या दोघांनी आशीर्वाद दिले. ध्यानाच्या वेळेस अनेकांना विविध अनुभव आले. काहींना डोक्याच्या वर भार जाणवला तर इतरांना वरून खाली प्रकाशाच्या दिव्य प्रवाहाचा अनुभव आला. साधकात उपस्थित असलेले एक ज्येष्ठ साधक श्री अंबालाल पुराणी म्हणाले ‘ आज पृथ्वीच्या चेतनेत उर्ध्वशक्ति अवतरीत झाली.’त्याच क्षणी दत्ता( मिस हडसन) यांना प्रेरणा झाली आणि त्यांनी मोठ्या गंभीर आवाजात घोषणा केली की आज स्थूल भूमिकेत भगवंतांचे अवतरण झाले. यालाच आपण सिद्धी दिन म्हणून संबोधतो .
या दिवशी प्राप्त झालेल्या सिद्धी च्या संदर्भात श्री अरविंद यांनी स्पष्टीकरण दिले आहे- ते म्हणतात “24 नोव्हेंबर 1926 ला कृष्ण तत्वाचे भौतिक तत्वात अवतरण घडले म्हणजेच अधिमानस ( over mind) तत्वाचे अवतरण घडले ”.
अधिमानस शक्ती ही श्री कृष्ण चेतना होय. श्रीअरविंदांनी या श्रीकृष्ण चेतनेला धारण केले व भौतिक पातळीवर आपल्या शरीरात स्थापित केले. या पूर्वी ती चेतना त्यांच्या शरीराचा स्पर्श करून परत जात होती पण २४ नोव्हेंबर ला ती पूर्णपणे शरीरात स्थिरावली. त्यामुळे अतिमानस प्रकाशाला पृथ्वीवर अवतरण करणे शक्य होणार होते. या दिवसापासून श्री अरविंदांनी एकांतवास पत्करला. 1926 ते 1950 हा चोवीस वर्षाचा काळ त्यांनी एकाच खोलीत अधिक गहनतम व तीव्रतम ध्यानात घालविला……
याच दिवशी श्री अरविंद आश्रमाची स्थापना झाली.एका अर्थाने श्री अरविंदांच्या ऐहिक जीवन व अध्यात्मिक साधना या दोन्ही दृष्टीने 24 नोव्हेंबर हा दिवस एक महत्त्वाचा टप्पा व परिस्थितीला कलाटणी देणारा देव मुहूर्त ठरला.मानवाच्या ईश्वर प्रेरित अध्यात्मिक विकासक्रमातील ती एक ‘दिव्य घटना’ होती. या घटनेने एका नवीन श्रेष्ठतर अध्यात्मिक युगाचा जणू पायाच घातला. म्हणूनच आपण म्हणू शकतो की
“ln a new act of the drama of the world the United to began a greater age”.

प्रा. रामेश्र्वर राठी