गीता प्रबंध

खुप लहान असताना श्री दामोदरदासजी मुंदडा यांनी मला ‘गीताई’ दिली होती. शाळेत असताना स्थितप्रज्ञाची लक्षणे आम्हाला पाठ करायला होती. घरी भग्वद-गीतेवर नेहमीच चिंतन व्हायचे. श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाशी ओळख झाली व त्याचा मनावर व जीवनावर प्रभाव होताच. श्री अरविंदांचे बहुतेक साहित्य इंग्रजीतून असल्याने फारसे वाचन केले नव्हते. मध्यंतरी ठरवले की दर रविवारी आपण थोडे थोडे काही तरी वाचत जाऊ. त्यावेळी ‘गीतेवरील निबंध’ हा ‘Essays on Geeta’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचायला सुरुवात केली. दर रविवारी थोडे थोडे आम्ही वाचत असू. वरकरणी अरविंदांचे साहित्य समजायला अवघड वाटते. परंतु  ते समजायला लागले. आणि त्यात आनंद मिळत गेला.

     भग्वद-गीतेबद्दल अनेक विश्लेषणे मांडली गेली आहेत, आजही मांडली जातात. श्री अरविंदानी अनेक गीतेवरील विश्लेषणांचा उल्लेख करत व वेद व उपनिषदांचा संदर्भ देत गीतेचा तुलनात्मक अभ्यास या ग्रंथात मांडला आहे. या प्रबंधात सुरुवातीलाच श्री अरविंद स्पष्ट करतात की, ‘भगवत-गीता अभ्यासताना आपला हेतू  हा  असावा की गीतेमधून आपल्याला खराअभिप्राय मिळावा, तसेच गीतेतून  योग्य संदेश मिळावा जो आपल्या जीवनाला उच्चतर आध्यात्मिक जीवनाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करेल. गीता फक्त निस्वार्थ कर्तव्य पालन करण्यास शिकवत नाही तर ‘सर्व धर्म परीत्याज्यं’ असे सांगत दिव्य जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी सर्व धर्मांचा परित्याग करून परमात्म्याचा आश्रय घेण्यास सांगते. गीता ही फक्त कर्मयोग म्हणजे काय याबद्दल   मार्गदर्शन करण्यापुरतीच मर्यादित नसून ज्ञानयोग व भक्तीयोगाचा मार्गही दाखवते.’ या पुस्तकात या सर्वांबद्दल विस्तृतपणे विवेचन केले आहे.

सांख्ययोग समजावताना प्रकृती विषयी ते म्हणतात, ‘प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. सत्व हे ज्ञानाचे बीज आहे. जे कृतीशीलतेतून स्थित आहे. रज हे शक्ती व कर्माचे मूळ आहे. शक्ती च्या माध्यमाने क्रिया घडवत सृष्टी बनते. तमस हे जडत्व व अज्ञानाचे मूळ आहे.सत्व आणि रज यांना लपवून टाकणारा आहे, सृष्टीत जे जे काही घडत असते त्याचा संहार तमस करते. हे तीनही गुण साम्यावस्थेत असले की गती, कर्म, सृष्टीकाहीच नसते, प्रकृती जिथे आहे तिथेच राहते.आपल्या तिन्ही गुणांसह सृष्टी कर्म करत असते. परंतु सृष्टी आणि मानव या द्विविध सत्ता जग चालण्यासाठी कारणीभूत आहेत. एक निष्क्रिय चैतन्य व दुसरी गतिशील उर्जा. सांख्य योगात जगताची परिभाषा अशा पद्धतीने केली आहे.

     या पुस्तकाचे दोन खंड आहेत. पहिल्या खंडात २४ पाठ आहेत ज्यात भगवद्गीतेत जो योग सांगितला आहे त्याचे विस्तृत विवेचनकेले आहे.हे करत असताना गीतेकडून आपण काय अपेक्षा ठेवावी, मानव शिष्य, कुरुक्षेत्र, सांख्य आणि योग, कर्म आणि यज्ञ, समत्व, प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे, कर्मायागाचे सार अश्या वेगवेगळ्या विषयांवर मांडणी केली आहे.

   दुसरा खंड दोन भागात विभागलेला आहे. त्यापैकी पहिल्या भागात कर्म भक्ती आणि ज्ञान, विश्वात्म्याचे दर्शन-लोकक्षयकृत काल, विश्वात्म्याचे दर्शन-त्याची दोन रूपे, भक्ताचा मार्ग आणि भक्त अशा विविध विषयांवर भाष्य केले आहे. विश्व आणि मानव दोन्ही एकत्र असल्याशिवाय जग चालत नाही हे श्री अरविंदांनी सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यामुळे जग चालविणारे विश्वाचे रूप आणि विश्वात्म्याचे मानवी कर्तव्य या दोन्हीचेही वर्णन या भागांमध्ये केले आहे. दुसऱ्या भागात गुण, श्रद्धा आणि कर्म यामधील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकला आहे. त्यासोबतच परम गुह्य म्हणजे काय आणि गीता नेमका काय संदेश देते, गीतेचा सार काय हे त्यांनी समारोपात मांडले आहे.

      खरेतर या पुस्तकाचा असा अल्प परिचय देणे अवघड आहे. पण मला वाटते आपल्या सर्वांना भगवद-गीता नेमके काय सांगते हे समजून घेण्यात निश्चित उत्सुकता असते व तसे जगण्यासाठी प्रयत्न करायचा असतो.श्री  अरविंदांनी भग्वद-गीतेत योग मार्ग परमात्म्यासोबत एकत्व प्राप्तीच्या दिशेने कसा नेतो याचे उत्कट मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे.

पुस्तक पृष्ठ संख्या: ६८३

पुस्तक प्रकाशक: श्री अरविंद आश्रम प्रकाशन विभाग