श्री अरविंद यांचे प्रतीक

पूर्णयोग साधनेबद्दल मार्गदर्शन करताना श्रीअरविंद ‘माता’ पुस्तकात दोन महान शक्तींचा उल्लेख करतात. एक आहे ‘मानवाच्या अंतःकरणातील आवाहन आणि प्रबळ अभीप्सा’ तर दुसरी आहे ‘भागवत कृपा’, जी या आवाहनाला व अभीप्सेला उत्तर देते.
वरील चित्र श्रीअरविंदांच्या योग प्रतीकाचे चिन्ह आहे, ज्यामध्ये पूर्णयोग सामावलेला आहे.
वरील चित्रात दोन त्रिकोण आहेत. एक त्रिकोण खालून वर जात आहे तर दुसरा त्रिकोण वरून खाली येत आहे.
वरच्या बाजूला जाणारा त्रिकोण अभीप्सेचे प्रतीक आहे तर खालील बाजूला येणारा त्रिकोण भागवत कृपा आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे.
आपल्या मनुष्य प्रकृतीचे तीन मुख्य अंग आहेत- शरीर,प्राण आणि मन. आपली अभीप्सा या तिन्ही अंगांच्या माध्यमाने झाली पाहिजे. ब्रह्माचे तीन स्वरुप म्हणजे सत्, चित आणि आनंद. या तिन्ही स्वरूपामुळे मानवी आवाहनाला प्रतिसाद म्हणून भागवत कृपा आणि आशीर्वाद यांचा वर्षाव होतो. मधोमध असलेले कमळाचे फूल परम पुरुष आणि जलसृष्टीचे प्रतिनिधित्व करते. मनुष्याची अभीप्सा आणि ईश्वराची कृपा यांच्या मीलनाने भागवत जीवनाचा प्रारंभ होतो आणि ते नव्या सृष्टीचे प्रतीक आहे.
ईश्वर प्राप्तीची तीव्र इच्छा बाळगून भागवत कृपेला केलेले आवाहन म्हणजेच अभीप्सा. भौतिक शरीरासाठी भोजन,पाणी व श्वास यांचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व भागवत जीवनासाठी ईश्वराला केलेल्या आवाहनाला आहे.
अशा प्रकारे खालच्या दिशेने येणारा त्रिकोण म्हणजे सत -चित -आनंद आणि वरच्या दिशेने जाणारा त्रिकोण म्हणजे मानवाचे जीवन- प्रकाश व प्रेमाच्या अभीप्सेचे प्रतिनिधी होत. यातील चौकोन ही पूर्ण अभिव्यक्ती असून त्यातील कमळ हे उच्चतम शक्तीचे प्रतीक आहे.
चौकोनातील पाणी जगातील सृजनशीलतेच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करते. श्रीअरविंद यांचे हे प्रतीक म्हणजे पूर्णयोगाचा सार आहे.

प्रा.बी.आर.काबरा