५ डिसेंबर -योगी श्रीअरविंद यांचा महासमाधी दिवस

५ डिसेंबर २०२१ चा दर्शन संदेश

एखादं आयुष्य कसं जगावं, मिळालेलं शरीर ईश्वर कार्यात कसं खर्च करावं आणि शरीराचं साधन सोडावं लागल्यानंतरही विदेही अवस्थेत आपले अवतारकार्य कसं चालू ठेवावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीअरविंद होय. १९०८ साली त्यांनी आपले मन स्थिर आणि निर्विचारी केले. १९०९ मध्ये अलीपूर जेल मध्ये त्यांना वासुदेवम सर्वमितीची अनुभूती मिळाली, वर्ष १९२० मध्ये परब्रम्हाचा अनुभव घेऊन वर्ष १९२६ मध्ये श्रीकृष्ण चेतनेशी एकरूप होऊन पुढील चोवीस वर्ष श्रीअरविंदांनी एकाच खोलीमध्ये आपली पुढील योग साधना केली. आपणास ‘ऑल लाइफ इज योगा’ हा त्यांचा संदेश दिला. श्रीअरविंदाचा पूर्णयोग हा आपल्याला आपले आयुष्य जगताना ईश्वरी चेतनेशी एकरूप होण्यासाठी जग सोडून हिमालयात जाण्यास सांगत नाही. दैनंदिन जीवनात आरोग्यधन प्राप्तीसाठीचा तो सकाळचा क्लास नाही तर दिवसाच्या चोवीस तासांचा पूर्ण भाग आहे. श्रीअरविदांनी भाषा, भारतीय आणि पाश्चिमात्य तत्वज्ञान, इतिहास, राजकारण, समाजकारण मानसशास्त्र या सर्व विद्याशाखांना अध्यात्मिक पारीपेक्षातून पाहिले. हा परिपेक्ष माणसाच्या चेतना विकासातून अधिमानसा पर्यंतचा प्रवास सुगम कसा करेल यासाठी ते प्रयत्नशील राहिले. आपल्या साहित्याच्या सदोतीस ग्रंथांमधून संकल्प आणि संकल्पनांचे सार त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले. हे सर्व ग्रंथ श्रीअरविंद आश्रमाच्या संकेतस्थळावर वैयक्तिक वापरासाठी अगदी मोफत उपलब्ध आहेत. श्रीअरविंदांना कसे समजून घ्यावे आणि त्याचे ग्रंथ कसे वाचावेत याचे सोपे निरूपण आता युट्युब सारख्या माध्यमांवरही उपलब्ध आहेत. स्वतःच्या अध्यात्मिक उन्नयनासाठी हे जग सोडून जाण्याची गरज नाही या एका विचाराच्या आधारावर पूर्णयोग हा संपूर्ण आयुष्याला योगमय करू पाहणारा योग आहे. जीवन हे दिव्य जीवन केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी उपलब्ध व्हावं यासाठी श्री अरविंद आणि माताजी सदैवप्रयत्नशील आणि कार्यरत राहिले. आपल्या योग साधनेने या दोन्ही दैवी चेतनेने मानवा साठी अधिमानसाचा टप्पा सुखकर केला आहे. हे दैवी कार्य पूर्ण होण्यासाठी जर शरीर सोडून जाण्याची वेळ आली तर आधी श्री माताजी शरीर त्याग करतील की श्रीअरविंद शरीर त्याग करतील यासंबंधी दोघांचाही संवाद उपलब्ध आहे. श्रीअरविंदांनी वेळ आलीच तर आधी मी शरीर त्याग करेन आणि पूर्णयोगा चे काम पुढे चालू ठेवेन हे नमूद केले होते ४ डिसेंबर १९५० ला रात्री १. २६ मिनिटांनी श्रीअरविंदांनी त्यांचा शरीर त्यागाचा निर्णय घेतला. यावेळी त्यांचे परिचयाचे साधक, डॉक्टर्स आणि अनेकांना आपल्या कृपादृष्टीने बरं करणारे आपण स्वतः का शरीरत्याग करत आहेत असा प्रश्न पडला होता. श्रीमाताजींनी श्रीअरविंदानी शरीरत्यागाचा निर्णय घेतला आहे. आणि तो कोणी

बदलू शकत नाही असे स्पष्ठ केले. वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने श्रीअरविंदाच्या शरीराच्या सर्व हालचाली थांबलेल्या होत्या आणि पुढील विधी करावेत का अशी विचारणा करणाऱ्या साधक डॉक्टरच्या डोक्यावर श्रीमाताजी यांनी हाथ ठेवला ठेवला आणि श्री अरविंद यांच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या स्वर्ण लहरींचा बघण्याची दृष्टी त्यांना प्राप्त झाली. ही अतिमानसाची ऊर्जा श्रीअरविंदाच्या शरीरातून पुढील पाच दिवस उत्सर्जित होत राहिली. शरीरावर कसल्याही प्रकारचा भौतिक फरक पडला नव्हता. दिनांक ९ डिसेंबर १९५० रोजी आश्रमाच्या परिसरात सर्व्हिस ट्री च्या छायेत समाधी बनवण्यात आली. त्यावळे ६००००

लोकांनी श्रीअरविंदाचे अंतिम दर्शन घेतल्याची नोंद आहे. आजही त्यांच्या साधकांसाठी या समाधी वरचे वाक्य तितकेच प्रेरणादायी आहे.अध्यात्म हा समजावून सांगण्याचा आणि समजण्याचा विषय नसून तो अनुभूतीचा विषय आहे. अशा अनुभूतीचा अनुभेद तीन वर्षाच्या पुढील सर्व लोकांसाठी खुला आहे. पांडिचेरी आश्रमात समाधी जवळ उभं राहून ही अनुभूती नक्की अनुभवावी आणि प्रसन्न आणि शांतीचा अनुभव घेण्याचा संकल्प हा श्रीअरविंदांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरू शकेल.

प्रा. अविनाश मधाळे