पुस्तक परिचय -‘ प्रार्थना आणि ध्यान ‘

“प्रार्थना अशी करा की सर्व काही ईश्वरावरच अवलंबून आहे आणि प्रयत्न असे करा की जणू सर्व काही स्वतःवरच अवलंबून आहे, ” असं म्हणतात कारण थोडसं “ध्यान” दिलं तर आपल्या लक्षात येईल — ‘ पिंडी ते ब्रम्हांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी ! ‘ … हाच अनुभव श्री माताजींचं ‘ प्रार्थना आणि ध्यान ‘ हे पुस्तक वाचताना येतो. श्री माताजींनी फ्रेंच मध्ये लिहिलेल्या ‘ Prie’res et Meditations ‘ या संग्रहातून श्री अरविंद यांनी काही निवडक प्रार्थना इंग्रजीत अनुवादित केल्या. त्याचाच मराठी अनुवाद कु. विमल भिडे यांनी ‘ प्रार्थना आणि ध्यान ‘ पुस्तक रुपाने केला. याची प्रथमावृत्ती ऑगस्ट १९६९ तर सुधारित द्वितीय आवृत्ती ऑगस्ट १९८२ ला श्री अरविंद आश्रम प्रकाशन विभाग, पाँडेचेरी तर्फे प्रसिद्ध करण्यात आली. 

श्री माताजीं ची प्रखर योग साधना चालू असताना त्यांनी लिहिलेल्या दैनंदिनीतील काही उतारे या पुस्तकात संग्रहित केले आहेत. मुख्यतः तीन प्रकारच्या साधकांना अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी म्हणून हे पुस्तक उपयुक्त आहे. आत्म विजय मिळवण्याची जे साधना करीत आहेत त्यांना, भगवंताकडे नेणारा मार्ग शोधून काढण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना आणि भगवत्कार्याला अधिकाधिक वाहून घेण्याची ज्यांची अभिप्सा आहे त्यांना हे पुस्तक उपयोगी पडू शकेल. याबरोबरच आधुनिक काळात योग शिक्षकांना योगनिद्रा किंवा ध्यान शिकवताना साधकांच्या अंतर्मनातील अध्यात्मिक शक्ती जागृत करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सूचना म्हणूनही हे पुस्तक मार्गदर्शक ठरतं.

२ नोव्हेंबर १९१२ पासून सुरू झालेली ही दैनंदिनी २३ ऑक्टोबर १९३७ पर्यंत येऊन थांबते ती एका सक्रिय , ज्वलंत , संपूर्णतः अविचल अशा दृढ श्रद्धेचं पसायदान घेऊन ! …असं म्हणतात की आपल्या इच्छा आकांक्षा आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्या अधिक उत्कट, प्रभावी आणि अचूक होतात. कदाचित म्हणूनच, २ नोव्हेंबर १९१२ च्या दैनंदिनीत श्री माताजी लिहितात — ” माझे संपूर्ण अस्तित्व तत्वतः मी तुला अर्पण केले असले तरीही ते समर्पण सर्वांगीण व सांगोपांग करीत जाणे मला कठीण वाटत आहे. हे कळण्यास मला कित्येक आठवडे लागले की तुला उद्देशून दररोज प्रार्थना करणे हाच या ध्यानावस्थेस लिखित स्वरूप देण्याचा खरा उद्देश आहे, त्यातच त्याची सार्थकता आहे. ” 

श्री माताजींचे पुढील आत्मनिवेदन आपल्यासारख्या सामान्य माणसाशी नातं सांगतं. त्यामुळे जी अध्यात्मिक पातळी श्री माताजींनी गाठली होती तीच पातळी एक सामान्य माणूसही गाठू शकतो हा आत्मविश्वास नकळत आपल्यात जागा होतो. त्या म्हणतात, ” अजूनही दिवसातून कितीतरी वेळा मी अशी वागते की ज्या वेळी माझी कामे तुला समर्पित झालेली नसतात. त्यामुळे ताबडतोब एक प्रकारची, वर्णन करता येणार नाही अशी अस्वस्थता मनात उत्पन्न होऊन ती अस्वस्थता हृदयातील वेदनांनी माझ्या शारीरिक जाणिवेत प्रकट होते… नंतर मी माझ्याच कृतीकडे तटस्थ दृष्टीने बघते आणि तेव्हा ती मला हास्यास्पद, बालिश आणि निंद्य भासते. मला खेद वाटतो… क्षणमात्र मी दुःखी – कष्टी होते ,पण लगेच बालसुलभ विश्वासाने मी स्वतः तुझ्या मध्ये बुडी घेते. स्वतःला विसरून जाते आणि माझ्याकडून झालेल्या प्रमादांचे परिमार्जन करण्यासाठी तुझ्याकडून प्रेरणा मिळावी व आवश्यक असे सामर्थ्य मिळावे म्हणून मी वाट पाहत राहते.”

१९ नोव्हेंबर १९१२ च्या दैनंदिनीत त्या प्रांजळ कबुली देतात — “अतिशय तळमळीने तुला शोधणार्‍या एका इंग्रज तरुणास मी काल म्हटले की मला परमेश्वराचा निश्चित शोध लागला आहे आणि त्याच्याशी मी सतत एकत्व अनुभवत आहे. खरोखर माझी अशी स्थिती असून तिची मला चांगलीच जाणीव आहे. ” मात्र… मात्र जोपर्यंत, ही मी ची जाणीव असते तोपर्यंत द्वैत उरतेच. जसं काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू नी लिहीले तरच जाणवते तसं… म्हणूनच पुढे त्या म्हणतात ,”ज्या अवस्थेमध्ये ‘मी’ ही भावना समुळ लुप्त होऊन जाईल, अशा एकत्वाच्या अनुभवापासून मी अजूनही दूर खरोखरीच फारच दूर आहे.”

२८ नोव्हेंबर १९१२ रोजी, श्री माताजी हे स्पष्ट करतात की — “अभिमानी व आत्मसंतुष्ट राहण्याची वृत्ती साधना मार्गावरील सर्वात हानिकारक अडथळे आहेत. अतिशय नम्र भावाने आपण सर्व बारीक-सारीक संधींचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्यातील असंख्य अंशांचे मर्दन करून त्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी, त्यांना लवचिक करण्यासाठी, त्यांना व्यक्तिनिरपेक्ष करण्यासाठी, आत्म-विस्मृती, परित्याग, दया आणि कोमलता शिकवण्यासाठी या संधी आलेल्या असतात. या सर्व वृत्ती जेव्हा अंगवळणी पडतात तेव्हा आपल्यातील सर्व अंश मिळून दिव्य तत्वाच्या चिंतनात सहभागी होण्यास परमोच्च एकाग्र अवस्थेत तुझ्याशी एकरूप होण्यास तयार होतात. म्हणूनच उच्च कोटीतील साधकांच्या बाबतीत सुद्धा हे कार्य दीर्घ व संथपणे व्हावे लागते. त्याचबरोबर एकाएकी आकस्मिक घडणारे परिवर्तन ही सर्वांगपूर्ण होऊ शकत नाही असे मला वाटते. आकस्मिक परिवर्तनांनी व्यक्तीचा जीवन विषयक दृष्टिकोन बदलून जातो. निश्चितपणे योग्य आणि सरळ मार्गास ती लागते परंतु ध्येय खऱ्या अर्थाने प्राप्त होण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारचे व प्रत्येक क्षणी येणारे असंख्य अनुभव घेण्याची आवश्यकता असते, त्यातून मात्र कोणीच सुटू शकणार नाही. हे परम स्वामिन् ! माझ्या अंतरंगी व प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी तू प्रकाशत आहेस, तुझा दिव्य प्रकाश प्रकट होऊ दे आणि सर्वांकरता तुझ्या दिव्य शांतीचे राज्य येथे येऊ दे.” 

आज आधुनिक युगात क्षणा – क्षणाला आपलं मन या ना त्या कारणाने अस्वस्थ होते. ते होऊ नये म्हणून श्री माताजींचे ५ डिसेंबर १९१२ चे आत्मनिवेदन आत्मसात करण्यासारखे आहे. ” शांती आणि निश्चल नीरवता यामध्येच शाश्वत तत्त्व प्रकट होते. कशानेही स्वतःला अस्वस्थ होऊ देऊ नका म्हणजे शाश्वत तत्त्व प्रकट होईल. कोणत्याही अवस्थेमध्ये संपूर्ण समता राखा म्हणजे शाश्वत तत्त्व तेथेच उपस्थित असलेले तुम्हास दिसेल….खरेच, तुझा शोध करण्यासाठी आम्ही अत्याधिक उत्कंठा धरता कामा नये, अतीव प्रयास करता कामा नयेत. कारण ही उत्कंठा आणि हे प्रयासच तुला झाकून टाकणा-या एखाद्या पडद्या प्रमाणे ठरतात. तुझ्या दर्शनाची आम्ही इच्छा धरता कामा नये कारण ती इच्छा सुद्धा एक प्रकारची मनाची प्रक्षुब्धताच असते व त्यामुळे तुझे शाश्वत सान्निध्य झाकोळले जाते. केवळ पूर्णतम शांती, प्रसन्नता आणि समता यामध्येच, ‘सर्व काही तूच आहेस’ तसेच ‘तूच सर्व काही आहेस’ हे कळते. पण संपूर्ण विशुद्ध आणि शांत अशा या वातावरणात यत्किंचित जरि स्पंदन निर्माण झाले तरी तेवढ्यानेही तुझ्या अविष्कारा मध्ये अडथळा येतो. जरासुद्धा घाई नको, अस्वस्थता नको, ताण नको, सर्व काही तूच, एक मात्र तूच आहेस अशी जाणीव कोणत्याही प्रकारचे विश्लेषण किंवा निरीक्षण न करताही आली पाहिजे, म्हणजे तेथे तूच उपस्थित असणार यात शंका नाही. कारण अशा वेळी सर्व काही पावन शांती आणि पवित्र नीरवता यामध्ये परिणत होऊन जाते. जगातील सर्व ध्यानापेक्षा ही अवस्था अतिशय श्रेष्ठ आहे.” 

परंतु लहान-सहान अपूर्णता आणि अगणित आसक्ती हा आणखी एक दुसरा पडदा भगवंताच्या आविष्कारात अडथळा ठरतो हे स्पष्ट करताना श्री माताजी ११ डिसेंबर १९१२ रोजी लिहितात — ” हा दुसरा पडदा विदीर्ण होऊन एकत्वास अधिक पूर्णता यावी म्हणून, त्वरा न करता, अशांत न होता मी प्रतीक्षा करत आहे. असंख्य लहान – लहान प्रयत्नांचा परिणाम म्हणून आणि क्षणभरही खंड न पडता, जागरुक राहिल्याने हळूहळू हा पडदा नाहीसा होणार की तुझ्या सर्वशक्तिमान प्रेमाच्या प्रचंड प्रकाशाने तो क्षणार्धात नष्ट होणार हे मला माहीत नाही आणि हा प्रश्न मी स्वतःला विचारीतही नाही. तूच एकमात्र कर्ता आहेस आणि मी एक साधन आहे, तुझ्या इच्छेशिवाय काहीच घडू शकत नाही या निश्चयपूर्ण श्रद्धेने मी प्रतीक्षा करीत आहे, शक्य तितके जागरूक राहत आहे. जेव्हा हे साधन पूर्णतर अभिव्यक्तीसाठी योग्य होईल तेव्हा अगदी स्वाभाविकपणेच अभिव्यक्तीही होईल. तुझ्या दिव्योदात्त अस्तित्वाची साथ देणाऱ्या आनंदाच्या निःशब्द लहरींचे स्वरवृंद – संगीत आताही पडद्यामागून ऐकू येत आहे.” ५ फेब्रुवारी १९१३ रोजी देखील त्यांनी या गोष्टीचा पुनर् उल्लेख केला आहे – “माझ्या हृदयाच्या नीरवते मध्ये सुमधुर संगीता प्रमाणे तुझा आवाज ऐकू येत आहे, माझ्या मेंदूमध्ये शब्दांच्या रूपाने तो अनुवादित होत आहे. ते शब्द पुरेसे अर्थ वाहक नसले, तरी तुझ्या अस्तित्वाने ते परिपूर्ण भरलेले आहेत. हे शब्द पृथ्वीला उद्देशून सांगत आहेत,” ऐक, हे पृथ्वी, ओजस्वी वाणी घुमत आहे ती ऐक.. ऐक आणि पुन्हा धैर्य धारण कर ! ” 

सहजतेतच सुंदरता असते , असीम शक्ती त्यातच वसते असं उद्बोधन करणारं श्री माताजींचं १२ फेब्रुवारी १९१३ चं टिपण बघा — ” एखादे फूल गाजावाजा न करता किंवा धडपड न करता जसे आपोआप सहजतेने फुलते, सुगंध दरवळविते त्याचप्रमाणे कोणत्याही कृतीमागील, अभिव्यक्ती मागील धडपड नाहीशी झाली म्हणजे ती कृती अतिशय सहज होते. अशा सहजते मध्येच महत्तम शक्ती वास करते, तिच्यामध्ये कमीत कमी संमिश्रण असून त्यापासून हानीकारक प्रतिक्रिया सर्वात कमी उद्भवतात. तत्काळ फलप्राप्ती ची चटक लागल्याने आपली सर्व कृती योग्य मार्गापासून दूर जाते आणि आपण जे काही करतो त्यामध्ये भ्रम आणि मृत्यू यांची बीजे पेरली जातात. सरलता ! सरलता ! खरोखर तुझ्या उपस्थितीचे पावित्र्य किती मधुर आहे !” 

सरलता ? आजच्या “अराजकीय” गोलमाल च्या जमान्यात, श्री माताजींनी २१ जुलै १९१३ला लिहिलेल्या वाक्यांची यथार्थता पटते, “अजूनही कितीतरी धीर धरण्याची आवश्यकता आहे! प्रगतीच्या पायऱ्या किती अस्पष्ट आणि अनाकलनीय आहेत! आता उगवणारा हा दिवस पृथ्वीसाठी आणि तिच्या वरील मानवांसाठी थोडा अधिक शुद्ध प्रकाश, अधिक खरी शांती घेऊन येऊ दे . तुझा अविष्कार अधिक परिपूर्ण होऊ दे, मानव जातीला काही उच्चतर ,उदात्त आणि सत्य गोष्टींचा साक्षात्कार होऊ दे ,अधिक विशाल आणि गंभीर प्रेम प्रसृत होऊ दे ,म्हणजे दुःखद जखमा भरून निघतील. उदयोन्मुख सूर्याचा हा पहिला किरण म्हणजे आनंद आणि सुसंवाद यांच्या वैभवशाली तेजाचे प्रतीक ठरू दे. आमचा सारा अहंकार आणि क्षुद्र गर्व लोभ आणि अपूर्ण ज्ञान यांचा निरास कर म्हणजे त्यामुळे तुझ्या दिव्य प्रेमाने प्रदिप्त होऊन आम्ही जगाचे मार्गदर्शक दीप होऊ. “

पाच वर्षाच्या दिव्य साधने नंतर १२ जुलै१९१८ च्या आत्मनिवेदनात श्री माताजी उद्गारतात, “एकाएकी तुझ्यासमोर माझा अभिमान गळून पडला ! तुझ्या सान्निध्यात असताना स्वतःच्या अतीत जाण्याची इच्छा करणे कसे व्यर्थ आहे हे मला समजले…… आणि मी रडले, मनसोक्त,मोकळेपणाने मी अश्रू ढाळले. माझ्या जीवनातील ते मधुरतम अश्रू !… काही दिवसांपूर्वी मी अशी वाणी ऐकली होती, ” मनमोकळेपणाने आणि निःसंकोचपणे जर तू माझ्या समोर रडशील तर अनेक गोष्टी बदलून जातील, एक महान विजय प्राप्त होईल.” ..आणि म्हणूनच जेव्हा माझ्या हृदया मधून माझ्या नेत्रांपर्यंत अश्रू आले तेव्हा मी तुझ्या समोर येऊन बसले. भक्तीभावाने अर्पण म्हणून ते तुझ्यासमोर ढाळले…आणि आता जरी मी अश्रू गाळत नसले तरी मला इतकी निकटता अनुभवास येत आहे की त्यामुळे माझे सारे अस्तित्वच हर्षाने थरारत आहे. बोबड्या शब्दात माझा आदरभाव व्यक्त करू दे …हर्षभरीत बालकाप्रमाणे मी तुला हाक मारून म्हटलं -” हे सर्वोत्तम एकमेव जिवलगा ! आम्ही तुला काय प्रार्थना करणार आहोत हे तुला आधीच कळते; कारण तूच तर तिचे उगमस्थान असतोस ! हे सर्वोत्तमा, माझ्या एकमेव सुहृदा, आम्ही जसे असू तसे तू आमचा स्वीकार करतोस. आमची याचना ऐकण्या करता किंवा मार्गदर्शन करण्याकरिता आम्ही तुझ्या खेरीज अन्य कुणा कडे धाव घेणे हे मूर्खपणाचे ठरेल; कारण तू ते करण्यास नेहमीच तयार असतोस, तू आम्हाला कधीच अंतर देत नाहीस. तुझ्यावर संपूर्ण भरवसा टाकून पूर्ण निश्चिंत राहिले असता आणि सहज भावाने आणि मनमोकळेपणाने तुला समग्र, निःशेष आणि 

निर्लेप – निर्मळ असे समर्पण केले असता प्राप्त होणार्‍या सर्व उत्तम, उदात्त आनंदाची तू मला जाणीव करून दिलीस.. आणि हे प्राणप्रिया, प्रमुदित बालकाप्रमाणे एकाच वेळी मी तुजसमोर स्मित केले आणि अश्रू सिंचन केले!”

सज्जन हो, २४ नोव्हेंबर १९३१ रोजी श्री माताजींनी जणू आजच्या परिस्थितीचे वर्णन अगदी अचूकपणे केले आहे. त्यामुळे आजही त्यांची हीच प्रार्थना, हीच तळमळ, मनाला लागलेली बोचणी आपल्याला तारु शकेल… “हे भगवान!.. हे भगवान! तुझे शत्रू सर्वत्र विजयी होत आहेत! असत्य हे जगाचे सम्राट झाले आहेत. तुझ्या शिवाय जीवन जगणे म्हणजे मृत्यू आहे, शाश्वत नरक आहे ! आशेची जागा साशंकतेने बळकावली आहे आणि समर्पणाची जागा बंडखोर वृत्तीने हिसकावून घेतली आहे . श्रद्धा आटून गेलीये. कृतज्ञतेचा अजून उदय झालेला नाही, अंध आवेग आणि संहारक सहजप्रवृत्ती, अपराधशील दुर्बलता यांनी तुझ्या प्रेमाचे मधुर नियमन झाकून टाकले आहे, त्यांचा कोंडमारा चालविला आहे. हे जगत्पते ! तुझ्या शत्रूंना तू प्रबल होऊ देणार काय ? असत्य, बीभत्सता आणि दुःख यांना विजयी होऊ देणार काय ? जगदीश्वरा, जिंकण्याचा आदेश दे; मग विजय ठरलेलाच आहे. मला माहित आहे की आम्ही अपात्र आहोत. मला माहित आहे की जगही अजून तयार झालेलं नाही. पण तुझ्या कृपेवर संपूर्ण श्रद्धा ठेवून मी तुला आर्त हाक मारीत आहे आणि मला माहित आहे की तुझी कृपाच आम्हांला वाचवील…. अशा रितीने माझी प्रार्थना तीव्र वेगाने वर उसळून तुझ्याप्रत पोहोचली. गर्तेच्या खोल भागातून मी तुला तुझ्या दैदिप्यमान ,वैभवपूर्ण स्वरूपात पाहिले. तू प्रकट झालास आणि मला म्हटलेस — “धैर्य खचू देऊ नकोस; दृढ रहा, सश्रद्ध रहा, निश्चिंत रहा…. मी आलोच ! “

२३ ऑक्टोबर १९३७ रोजी ची त्यांची प्रार्थना आपण प्रत्येकाने ध्यानपूर्वक अंतर्मनात रुजवली तर संपूर्ण मानव जातीचं कल्याण निश्चित आहे…….. ” हे भगवान, सर्वविघ्नविनाशका, तुझा जय जयकार असो ! असे वरदान दे की आमच्या मधील कोणतीही गोष्ट तुझ्या कार्यात बाधक होणार नाही.

असे वरदान दे की कोणतीही गोष्ट तुझ्या आविष्कारास विलंब होऊ देणार नाही.

असे वरदान दे की सर्व घटनांमध्ये आणि प्रत्येक क्षणी तुझीच इच्छा कार्यान्वित केली जाईल. 

असे वरदान दे की तुझ्याविषयी एक गाढ आणि तीव्र कृतज्ञता मनात बाळगावयास आम्ही कधीही विसरणार नाही.

असे वरदान दे की प्रत्येक क्षणी तुझ्या कडून आम्हाला ज्या अद्भुत वस्तू देणगी म्हणून मिळतात त्यापैकी कशाचाही आम्ही कधीही अपव्यय करणार नाही.

असे वरदान दे की आमच्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्या कार्यामध्ये सहकार्य देईल आणि सर्वकाही तुझ्या कार्यसिद्धीसाठी सज्ज होईल.

हे परमेश्वरा, सर्व सिद्धिदायका , तुझा जय असो ! तुझाच विजय होणार याविषयी एक सक्रिय आणि ज्वलंत, संपूर्ण आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर. ” 

मित्रांनो मला वाटतं आजच्या भयावह असुरक्षित जगात केवळ ही अविचल श्रद्धाच आपली तारणहार आहे . श्री माताजींनी या अढळ श्रद्धेची प्रचिती घेतली जेव्हा त्या महान योगी श्री अरविंदांना प्रथमच भेटल्या… ही अलौकिक घटना घडली, तो सुदिन होता २९ मार्च १९१४…. या अनुभवाला श्री माताजींनी दुसऱ्या दिवशी शब्दबद्ध केले. परंतु ३० मार्च १९१४ ची त्यांची दैनंदिनीतील नोंद इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे. त्याचा मराठी अनुवाद पुस्तकात नाही…तरीही माझ्या अल्पमतीला उमजलेला त्याचा भावार्थ सांगण्याचा , इथे यथाशक्ती प्रयत्न करत आहे —

“ज्यांनी तुझ्याशी अद्वैत साधलं आहे, त्यांच्या सान्निध्यात मला हे कळून चुकलं आहे की मी अजूनही तुझ्या पासून दूर, खूप दूर आहे. मी जी सर्वोत्तम आणि अत्यंत पवित्र अशा तुझी, सर्वोच्च कल्पना करू शकते त्याबाबत मी अज्ञानी आहे… परंतु या आकलना मुळे निराश होण्याऐवजी सर्व अडचणींवर विजय मिळविण्याची माझी अभिप्सा अधिकच प्रबळ , तीव्र आणि उत्कट होते. कालांतराने ध्येयाचं क्षितिज अज्ञान तमाशी द्वैत साधून मार्ग स्पष्ट होतो आणि आम्ही शाश्वता कडे अधिकाधिक वाटचाल करतो.” 

या सुस्पष्ट जाणीवेने स्वतः संपूर्णतः आश्वस्त होत श्री माताजी आपल्याला ही निश्चिंत करत आत्मविश्वासाने सांगतात , ” हजारो लोक घनदाट अंधारात बुडत असले तरी फारशी काळजी करण्याचे कारण नाही… कारण ज्यांना आम्ही काल पाहिलं, ते या पृथ्वीतलावरच आहेत ! त्यांच्या अस्तित्वाने एक दिवस असा येईल की अंधार, प्रकाशात रूपांतरित होईल आणि खरोखर, हे ईश्वरा ! वसुंधरेवर तुझं राज्य प्रस्थापित होईल ! हे देवा! अद्भुत विश्वाच्या निर्मात्या, तुझं राज्य प्रस्थापित होईल या विचाराने, असीम आशेने माझं हृदय आनंदाने, कृतज्ञतेने ओसंडून वाहते…. तुझ्याप्रती असलेला माझा आदरभाव, प्रेम शब्दांपलीकडे आहे……..”

चला तर, आपणही शब्दातीत ‘प्रार्थना आणि ध्यान’ आत्मसात करूयात , अंतर्यामी रुजवूयात … जीवन आपसुकच अर्थपूर्ण होईल ……..